१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Saturday, September 18, 2010

पुन्हा हवा 'क्ष' किरण

- राजीव काळे

('नवाक्षर दर्शन' ह्या सावंतवाडीहून प्रकाशित होणा-या  त्रैमासिकाने 'लघुनियतकालिक विशेषांक' प्रकाशित केला होता. त्यानंतर ८ जुलै २००९ मध्ये 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेला मजकूर. साभार इथे)

आजकालच्या मराठी वाङ्मयावरही कुणीतरी क्ष किरण टाकणारा हवा आहे. मराठी साहित्याच्या त्वचेमागील अवयव जागच्या जागी आहेत की नाहीत, त्यांचं काम योग्य रीतीनं चाललं आहे की नाही, त्यांना कुठल्या विकाराची बाधा झालेली नाही ना, अशा अनेक गोष्टी तपासायला हव्या आहेत. आणि फक्त क्ष किरणच नाही, तर जी जी म्हणून साधनं हाती लागतील त्यांनी मराठी वाङ्मयाची तब्येत एकदा झडझडून तपासायला हवी...
***

'टिळक-आगरकर ह्या जोडीत टिळकांची दुर्दशा आगरकरांपेक्षा शतपटींनी जास्ती आहे. हा गृहस्थ अत्यंत व्यवहारी - एखाद्या किराणाभुसाराच्या दुकानदारासारखा...'

'मर्ढेकरांवर इतके परिच्छेद खर्ची घातले, त्या अर्थी मर्ढेकर हे निदान एक महत्त्वाचे कवी तरी होतेच असा कदाचित कुणाचा समज होईल, पण तसे काही नाही. पाच-सहा कविता तर जवळपास कुणीही चांगल्या लिहितो आणि बाकीच्या नुसत्याच जुळवलेल्या असतात...'

'गाडगीळ आणि त्यांच्या टोळीतल्या मंडळींना कादंब-या मांडताच आल्या नाहीत.'

'तुकारामापुढे आपण अस्पृश्य आहोत हे आम्ही मानतोच. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव मराठीत असण्याची आपली लायकी नाही, हेही आम्ही मानतोच.'

'सत्यकथेसारखे मासिक मराठीतले साहित्याला वाहिलेले एकमेव मासिक असल्याचा दावा मांडला जातो, ह्याचे आम्हाला वाईट वाटते...'

हे सांगणं सन १९६३ मधलं.

'कॉम्प्युटरच्या आदेशावलीतले शब्द कवितेत वापरले की आपोआप आपली कविता आधीच्या कवितेपास्नं वेगळी पडेल, अशी भाबडी समजूत कित्येक कवी बाळगून असल्याचं आढळतं.'

'नव्या लिट्लवाल्यांना जुने लिट्लवाले आपले वाटतात ते का, हे कळत नाही. तशी जाण असल्याचे पुरावे त्यांच्या लिखाणात क्वचितच आढळतात...'

... हे सांगणं अगदी आताचं. सन २००९ मधलं.

ही सारी विधानं अशोक शहाणे यांची. सन १९६३ मध्ये शहाणेंनी एका परिसंवादात निबंध मांडला. पुढे तो 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' नावानं प्रसिद्ध झाला. मग त्यावर साहित्य वर्तुळात जे व्हायचं ते झालं. लिट्लवाल्यांबाबतचं त्यांचं निरीक्षण त्रैमासिक 'नवाक्षर दर्शन'च्या ताज्या अंकात छापून आलेलं. 'नवाक्षर दर्शन'चा हा लघुनियतकालिक विशेषांक. अशोक शहाणे, राजा ढालेंपासून ते हेमंत दिवटे, मंगेश नारायणराव काळे, डॉ. सुखदेव ढाकणेंपर्यंत... विविध परीच्या मंडळींचे लेख अंकात आहेत. 'आधल्यां'च्या आणि 'आजच्यां'च्या कविता त्यात आहेत. ही विविध परीची मंडळी वेगवेगळ्या पिढ्यांची म्हणायची का? कारण त्यांच्यात वयाचं अंतर मोठं. तर त्यासाठी शहाणेंच्या त्याच त्या 'क्ष किरण'वाल्या लेखाचा आधार घेऊ या. 'प्रत्येक पिढीचीच स्वत:ची अशी एक समुद्रसपाटी असते. ही समुद्रसपाटी दुस-या कोणत्याही पिढीच्या समुद्रसपाटीहून वेगळी असते', हे ऑतेर्गाचं म्हणणं शहाणे यांनी त्या लेखात उद्द्धृत केलं होतं. त्या चालीवर चालायचं आणि बोलायचं तर मग वरची मंडळी एकाच समुद्रसपाटीवरची असू शकतात किंवा भिन्न देखील.

ही अशी पार्श्वभूमी असताना आजकालच्या लिहित्या मंडळींची समुद्रसपाटी जोखायला हवी. ही मंडळी वयाच्या हिशेबात आजची असतील किंवा कालची देखील. पण म्हणून त्यांची समुद्रसपाटी एकच, असं खात्रीनं म्हणण्याजोगी परिस्थिती नाही. कारण, कालचं कुणी आजच्यासारखं लिहीत असेल, आणि आजचं कुणी अजूनही कालच्याच रेघोट्या मारीत असेल. मुळात 'आजचं लिखाण' अशी काही गोळीबंद संकल्पना तयार नाही. (तशी ती कुठल्याच काळात नसते म्हणा. तो ज्याच्या-त्याच्या समजाचा, आकलनाचा आणि बहुसंख्य प्रस्थापितांच्याही हाती असलेला मुद्दा.) त्यात इकडून तिकडून वाटेल तसे सूर मारायला संधी मुबलक. त्यामुळे केवळ वयाच्या तागडीत मोजून त्यांची वयं मोजता नाही यायची. लिखाणामागील प्रेरणा, हेतू, प्राधान्यक्रम आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे शब्द असे काही निकष लावले तरच हाती काही पडण्यास आशा उरते.

ही आशा धरून आजकालच्या मराठी वाङ्मयावरही कुणीतरी क्ष किरण टाकणारा हवा आहे. मराठी साहित्याच्या त्वचेमागील अवयव जागच्या जागी आहेत की नाहीत, त्यांचं काम योग्य रीतीनं चाललं आहे की नाही, त्यांना कुठल्या विकाराची बाधा झालेली नाही ना अशा अनेक गोष्टी तपासायला हव्या आहेत. आणि फक्त क्ष किरणच नाही, तर जी जी म्हणून साधनं हाती लागतील त्यांनी मराठी वाङ्मयाची तब्येत एकदा झडझडून तपासायला हवी. या वाङ्मयाला एक मोठी खोड आहे ती डोळे मिटून एकाच जागी बसून राहायची. कसरतीचे, फिरण्याचे, डोळे उघडून इतरत्र पाहण्याचे त्याला प्राय: वावडेच. अशाने अंगातील मेद वाढत जातो आणि त्यायोगे मिळते अनेक विकारांना निमंत्रण. म्हणूनच ही तपासणीची गरज. ही तपासणीही करायला हवी ती शहाणेंच्या रीतीने. पोस्टमॉर्टेमसारखी. जिवंत वस्तूचे पोस्टमॉर्टेम नाही होऊ शकत, हे मान्य करूनही ती तशीच व्हायला हवी. निदान कुणीतरी तसा प्रयत्न तरी करायला हवा. त्यातून जे काही निदान व्हायचं ते होऊ देत. निदान झालं की औषधं तरी सांगता येतात. नंतर ती घेण्याचं काम तब्येत ज्याची तपासली जाते त्याचं. औषधं घेतली तर त्यातून त्याचंच भलं होईल... नाहीतर त्याचं नशीब.


जाहीर बोलावणे
 श्री.........यांस,
आमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ विख्यात बोंबलभाड्या राजा ढाले : थोर बोंबलभिके अशोक शहाणे + भालचंद नेमाडे + रमेश रघुवंशी + एकनाथ पाटील + तुलसी परब + वसंत गुर्जर. तरी दिनांक पाच मार्च एकोणिशेएकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी.

- राजा ढाले, तुलसी परब, वसंत गुर्जर

'सत्यकथे'च्या होळीचं हे जुनं निमंत्रण 'नवाक्षर दर्शन'नं छापलं आहे. असे तापसी आज मिळतील? मिळाले तर एकत्र येतील? एकत्र आले तर होळी कशाची करतील?

No comments:

Post a Comment

मैत्र