अनेक बंगाली लेखकांची नावं आम्हाला माहीत झाली ती अशोक शहाणेमुळे. १९६० ते ६५ हा माझा साहित्यातला अगदी सुरुवातीचा काळ. याच काळात ‘प्रतिष्ठान’ आणि ‘सत्यकथे’मध्ये मी जास्तीत जास्त कविता लिहिल्या, कवितेनं विलक्षण झपाटून गेलो, मराठी कवितेची असंख्य पारायणं केली, चांगलं-वाईट मनात नोंदवून घेतलं, आणि जसजसं कवितेबाबतचं असमाधान वाढत गेलं, मराठीबाहेरची कविता शोधीत-वाचीत गेलो. त्यात इंग्रजीतनं आलेली परदेशी कविता होती, उर्दू-हिंदी कविता होती, आणि निव्वळ अशोक शहाणेमुळे माहीत झालेली बंगाली कविता होती. १९६१च्या अखेर निघालेलं ‘अथर्व’, मग १९६३च्या आसपास निघालेले काकतकरांच्या ‘रहस्यरंजन’चे अंक, १९६५च्या जवळपास घोषणा झालेलं पण कधीच न निघालेलं ‘हस्तक’ हे फक्त कवितांचं नियतकालिक, पुन्हा घोषित होऊन कधीच न निघालेलं ‘कथाली’, आणि त्या आधी दुसर्या पर्वात सुरू करून ओळीनं निघालेले ‘अभिरुची’चे ९ अंक एवढं अशोक शहाणे यांचं वाङ्मयीन कार्य आत्ताच्या पिढीला माहीत आहे की नाही, शंकाच आहे. पण माझ्यासारख्या कवितेवर प्रेम करून निष्ठापूर्वक जगणार्या त्या काळच्या तरुणांना अशोक शहाणे यांनी बरंच काही दिलं होतं. निखळ यादीच द्यायची तर ‘अथर्व’, ‘असो’मधून अशोकनं शक्ती चट्टोपाध्यायबरोबरच ज्यांचं साहित्य मराठीत आणलं ते कवी-लेखक जीवनानंद दास- उत्पलकुमार बसू- तारापद राय- शैलेश्वर घोष- सुरंजन चटोपाध्याय- प्रदीप चौधरी- वासुदेव दासगुप्त- सुभाष घोष इत्यादी. ही सगळी नावं १९६२ ते १९६५ च्या काळात ‘हंग्री जनरेशन’ म्हणून गाजलेल्या विद्रोही वाङ्मयीन चळवळीशी संबंधित होती. अशोकनं अशी अमेरिकेतली ‘बीट जनरेशन’, बंगालची ‘हंग्री जनरेशन’ म्हणजे भूखी पिढी, आणि मराठीतली संतप्त लेखकांची पहिली पिढी यांची नीट संगत लावून मराठी लोकांसमोर आणली. बीट जनरेशनचा अॅलन गिन्सबर्ग शक्तीदाचा मित्र, शक्तीदा अशोकचे मित्र, असा हा प्रकार होता.
***
चंद्रकान्त पाटीलांनी लिहिलेल्या ‘शक्तीदाबद्दल’ या लेखातील मजकूर.
***
![]() |
चंद्रकान्त पाटील |
No comments:
Post a Comment