१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Saturday, November 13, 2010

अशोक शहाण्यांची पंच्याहत्तरी

- नामदेव ढसाळ

('सर्वकाही समष्टीसाठी' या सदरात १३ फेब्रुवारी २०१० ला प्रसिद्ध झालेला मजकूर)

'खरं बोललं की सख्ख्या आईलाही राग येतो' अशी मराठीत म्हण आहे. आमचे ज्येष्ठ मित्र अशोक शहाणे खरे बोलण्यात वस्तादच आहेत. खरं म्हणजे सत्य. जस्सं आहे तस्सं. या असल्या 'खरं' बोलण्यातच चिक्कार शत्रू आपण निर्माण करतो हे खरं बोलणा-याच्या गावीही नसतं. अशोकने आज पंच्याहत्तरी गाठली. खरं बोलण्याचे त्याने डोंगरच डोंगर उभे केले. मग तुम्ही म्हणाल, च्यायला! या अशोक शहाण्यानं जणू उभं जगच आपलं शत्रू करून सोडलंय. यात गंमत अशी आहे पाहा- एवढे करून नावालाही कुणी अशोकचा आजवर शत्रू झाला नाही. आचरट, आतरंगी मूल जसं आई-बापांना छानपैकी आवडत असतं. अशोक ज्या लोकांच्या संपर्कात किंवा जे लोक अशोकच्या परिघात सापडतात त्यांची अवस्था आतरंगी मुलाच्या आई-बापासारखीच होते. सत्यान्वेषी सत्यप्रिय माणसं सहन करण्याची ही ताकद हळूहळू प्रत्येकात येतच असते. एरवी सत्य म्हणजे सापेक्षच गोष्ट. ज्याला आपण सत्य म्हणून संबोधलेलं असतं. ते असत्यही असू शकते. भाषासंज्ञेचा छान वापर करून उत्क्रांतपणाच्या वाढीत माणसाने सत्याची व्याख्या केली असेल. प्रमाण आणि कसोट्यांवरून सत्याची केलेली व्याख्या आपण धरून चालतो की याबाबत अमुकअमुक यास सत्य म्हणतात. पण त्या सत्याच्या व्याख्येलाच असत्याची व्याख्या माणसाने पहिल्यापासून म्हटले असते तर त्या सत्याला आपण असत्य म्हटले असतेच की. ही अशी शब्दार्थाची, त्याच्या व्याख्येची छान फिरवाफिरवी ज्याला करता येते- अशा फिरवाफिरवीत जो निष्णात असतो तो प्रत्येक जण मला अशोक शहाणेच वाटत राहतो. धडक, तिरकस चिमटे काढत बोलणारा प्रत्येक जण अशोक शहाणेच वाटत राहतो. असो.

अशोकच्या सत्यान्वेषी अभिवृत्तीपेक्षा मला आवडतो तो त्याचा मनुष्यवेल्हाळ स्वभाव. त्याच्या बोलण्या-चालण्यातून मोकळं-ढाकळं वागण्यातून त्याच्या संपर्कात येणारा माणूस त्याच्याशी कायमचा जोडला जातो. त्यात कवी, लेखक, कलावंत, माणसंच असतात असं नाही तर सर्वसामान्य माणूस त्याच्यासाठी अजीज असतो. एक विशेष गोष्ट तुमच्या ध्यानात आणून द्यायला हरकत नाही. कला, साहित्य क्षेत्रातलं मक्तेदारीचं अभिजनत्व नाकारून त्यातल्या सहज सरळ सोपेपणाला सर्जनशील अभिव्यक्तीची उपजत जाण असलेला अशोक अक्षरवाङ्मयात काम करणा-यांना प्रिय असतो. तसाच यासाठी अनभिज्ञ असणा-यांना तो या सर्वांची गोडी लावून जातो. ही ग्रेट गोष्ट अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणा-या महाभागांनाही जमत नाही. कारण त्यांची ज्ञानोपासना एकार्थी मर्यादितच असते किंवा एककल्ली असते. ज्ञानोपासनेच्या अर्थाने अशोक बाप माणूसच म्हटला पाहिजे. माझ्या बायकोने यापूर्वी दिलीप चित्रेला चालत्याबोलत्या विश्वकोशाची उपमा दिली होती. अशोकला अशा उपमेत डकवून मी त्याचा जगड्व्याळपणा छोटा करू इच्छित नाही. अशोक ज्ञानसंपन्न माणूस आहे, पण प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या अवडंबराने त्यातले माणूसपण मोडून गेलेले नाही. ते अधिक मनुष्यकेंद्री आणि अधिक मानवीय झालेले आहे. म्हणून त्याला ज्ञानाचा दंभ जडलेला नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी त्याची वृत्ती नाही. ज्ञानी मनुष्य उभे जग जोडतो. चराचर जोडतो. अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणारी माणसे मात्र अशोकचा हा वारसा पेलू शकलेली नाहीत. ज्ञानाच्या दंभात ती एवढी अमानुष झालेली असतात की, अखेरी ती पाहता पाहता मनुष्यद्वेष्टी होऊन जातात. अशोकबरोबरच्या वाङ्मयीन असो अथवा गैरवाङ्मयीन चर्चा मनाला आल्हाद देऊन जातात. ज्ञानजिज्ञासेच्या अर्थाने सुखावून जातात. अशोक स्वतःकडे, मित्रांकडे, जगाकडे, जगरहाटीकडे भाष्यकारांच्या नजरेतून बघत नाही. जगण्यावर अतोनात प्रेम असलेल्या आस्थेतून तो पाहतो. आज अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणून त्याच्या आप्तजन, मित्रांनी जागरण घातले. खरे तर चौसष्ट-पासष्टपासून मी अशोकला पाहत आलो. पहिल्यांदा जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो मला वय वर्षे शंभराचा वाटत आला. माझ्या बायकोने तर त्यावर छान कोटी केली. ती म्हणाली, काय म्हणावं, अशोकच्या मित्रांना अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणतात म्हंजे या लोकांनी शंभराकडून उलटी गिनती सुरू केली की काय! इतुका न मी म्हातारा, वय पाऊणशे नव्हे शंभर वर्षे जणू!

अनियतकालिकांच्या चळवळीचे अशोकला पायोनियर म्हटले जाते. एस्टॅब्लिशमेंटविरुद्ध त्याने वाङ्मयीन चळवळ उभी केल्याचे म्हटले जाते. याविषयी अशोकची मोकळी-ढाकळी मते. चंद्रकांत खोतप्रणित लघुनियतकालिकांच्या पहिल्या पर्वातील पाचव्या अंकात खोताने तयार केलेल्या प्रश्नावलीच्या अनुरोधाने अशोकची घेतलेली मुलाखत जिज्ञासूंसाठी डोळ्यातील अंजन ठरावे. नाना काकतकरांमुळे अशोक अनियतकालिकांच्या उपद्व्यापात सापडला. याचे मनोरंजक अशोकच्याच शब्दातले वर्णन लघुनियतकालिकांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. बांधिलकी, बंडखोरी, संतप्त पिढी वगैरे शब्दप्रयोग अनियतकालिकांच्या चळवळीला लावले गेले त्यात काही राम नव्हता असे अशोकचे म्हणणे. त्याचे म्हणणे एवढेच की, त्या दरम्यान जे साहित्यिक मूल्याविषयी, अभिव्यक्तीविषयी अवडंबर माजवले जात होते ते तोडून साहित्य सर्जन व्यवहारात मोकळे-ढाकळेपणा आणणे एवढेच उद्दीष्ट माझ्यासमोर होते, असे अशोकने 'अबकडइ'च्या प्रश्नोत्तरात म्हटले आहे.

अनियतकालिकांच्या चळवळीत अशोक ओढला गेला नाना काकतकरांमुळे. गांधी वधानंतर काकतकरांना आपले गावशीव सोडून मुंबईत यावे लागले होते. बाबुराव अर्नाळकरांची रहस्यमय कादंबरी विभागशः मासिकात छापून ज्या मासिकाचे नाव 'रहस्यरंजन' होते ते चालवले जात होते उदरनिर्वाहासाठी. याशिवाय खानावळीचा काकतकरांचा धंदा होता. या 'रहस्यरंजन' मासिकाचे संपादन काही कारणे सदानंद रेगे करीत असे. रवींद्रनाथ टागोरांवर अंक काढण्यासाठी सदूने 'रहस्यरंजन'च्या कंपूत अशोकला घेतले आणि अशोक अनायासे अनियतकालिकांच्या चळवळीशी जोडला गेला. अशोकचे बंगाली भाषेवरले, वाङ्मयावरले प्रेम असे कामी आले.

'रहस्यरंजन'नंतर 'अथर्व' या नियतकालिकाचा एकच अंक त्यानंतर तीन-चार वर्षांनी 'असो' या लघुनियतकालिकाची सुरुवात झाली. १४ अंक निघाले. हा लघुनियतकालिकांचा सव्यापसवव्य व्यापार अशोकला लिट्ल मॅगझिनचा पायोनियर बनवून गेला. खरे तर 'रहस्यरंजन' असो अथवा 'अथर्व' या अगोदर दिलीप चित्रे, रमेश समर्थ, मन्या ओक, भाऊ पाध्ये आदींना घेऊन अशोकने 'शब्द'चा अंक काढलाच  होता. नुसत्या 'शब्द'चा संदर्भही अशोकला या चळवळीचा पायोनियर बनविण्यास पुरेसा आहे. काहीही असो. या चळवळीला सैद्धांतिक भूमिका नव्हती. या मल्लिनाथीत आपल्याला रस नाही, परंतु या चळवळीमुळेच मराठी वाङ्मयातील अभिजनवृत्ती ही पराभूत झाली. याचे सर्व श्रेय या चळवळीला जाते. अशोकने या चळवळीच्या भाष्यकाराची भूमिका जरी वेळोवेळी नाकारली असली तरी मराठी साहित्यातील कोंडी या लघुनियतकालिकांमुळे फुटली. पुरोगामी साहित्य चळवळ असो अथवा दलित साहित्याची चळवळ अथवा विद्रोही साहित्याची चळवळ, लघुनियतकालिकांमुळे जोर धरू शकली.

No comments:

Post a Comment

मैत्र