१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Thursday, November 25, 2010

शहाण्यांबद्दल भालचंद्र नेमाडे

'ललित' मासिकाच्या पहिल्या म्हणजे जानेवारी १९६४च्या अंकात 'स्वागत' या सदरामध्ये भालचंद्र नेमाड्यांचा मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्यातला हा भाग-

'कोसला'बद्दल : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.
***

दुस-या एका ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या दुस-या एका लेखात नेमाडे म्हणतात-

मराठी साहित्याच्या हीनपणाची दखल न्यायमूर्ती रानड्यांपासून अशोक शहाण्यांपर्यंत दर दहावीस वर्षांनी कोणीतरी घेत आलेच आहे.
***

Sunday, November 21, 2010

शहाण्यांबद्दल राजा ढाले

('नवाक्षर दर्शन' ह्या सावंतवाडीहून प्रकाशित होणा-या त्रैमासिकाच्या 'लघुनियतकालिक विशेषांका'तील ढाल्यांच्या लेखातील हा काही भाग. मूळ लेखात ढाल्यांनी शहाण्यांशी लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीविषयी असलेले काही मतभेद त्यांच्या भाषेत मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे मांडले आहेत.)

शहाण्यांचं हे स्केच ढाल्यांनीच काढलंय.
मूळ हे 'ललित' मासिकाच्या
१९६८च्या दिवाळी अंकात आलं होतं
. . . असं असलं तरी अशोक शहाणे हे अखेर माझे एक गुरू आहेत. आयुष्याच्या एका अत्यंत नाजूक वळणावर, एका महत्त्वाच्या पडावावर, एका महत्त्वाच्या टप्प्यावर भेटलेला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणारा एक अप्रतिम गुरू. तो माझ्या विशीतच मला भेटला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानं मी थरारून आणि झपाटून गेलो. तो मला प्रथम भेटला तेव्हाही त्याच्या ऐन पंचविशीत तो मला म्हातारा वाटला आणि आजही वाटतो. अगदी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध! त्याला मी सतत एक गुरू म्हणून मान देत आलो आणि आमच्या पन्नास वर्षांच्या नात्यात कधी अंतराय निर्माण झाला नाही. उलट, त्याच्यामुळेच आमचा (म्हणजे माझा!) लिट्‍ल मॅगझिन्सच्या क्षितिजावर उदय झाला. अशा वेळी त्यानं आम्हाला काय शिकवलं हे महत्त्वाचं नाही. आम्ही त्याच्यापासून काय शिकलो हे महत्त्वाचं आहे. आणि हे त्यानं आम्हाला मुद्दाम म्हणून शिकवलं नाही. तर आम्ही अनुकरणातून आत्मसात केलं. उदाहरणार्थ, लेखनातून केलं जाणारं तीक्ष्ण शरसंधान अथवा प्रिंटिंगचं तंत्रज्ञान. हे म्हणजे एकलव्याच्या दृष्टांतासारखंच झालं. गुरूच्या नकळत त्याची कला हस्तगत करण्याचं काम! अशा वेळी त्याच्या अभयारण्यात त्यानं पाळलेलं परंपरेचं श्वान आमचा वास काढत आमच्या मागावर आलं, तेव्हा आमच्यावर सतत डूक धरून भुंकणार्‍या त्या परंपरागततेवर आम्ही अचूक शरसंधान करावयास चुकलो नाही. परंतु त्या परंपरेचं शरसंधानाने भरलेलं गच्च थोबाड पाहूनही त्यानं आम्हाला त्याबद्दल जाब विचारला नाही; अथवा आंगठाही कापून मागितला नाही. त्या दृष्टीनं हा द्रोणाचार्य थोरच!

Wednesday, November 17, 2010

शहाण्यांबद्दल चंद्रकान्त पाटील

अनेक बंगाली लेखकांची नावं आम्हाला माहीत झाली ती अशोक शहाणेमुळे. १९६० ते ६५ हा माझा साहित्यातला अगदी सुरुवातीचा काळ. याच काळात प्रतिष्ठानआणि सत्यकथेमध्ये मी जास्तीत जास्त कविता लिहिल्या, कवितेनं विलक्षण झपाटून गेलो, मराठी कवितेची असंख्य पारायणं केली, चांगलं-वाईट मनात नोंदवून घेतलं, आणि जसजसं कवितेबाबतचं असमाधान वाढत गेलं, मराठीबाहेरची कविता शोधीत-वाचीत गेलो. त्यात इंग्रजीतनं आलेली परदेशी कविता होती, उर्दू-हिंदी कविता होती, आणि निव्वळ अशोक शहाणेमुळे माहीत झालेली बंगाली कविता होती. १९६१च्या अखेर निघालेलं अथर्व’, मग १९६३च्या आसपास निघालेले काकतकरांच्या रहस्यरंजनचे अंक, १९६५च्या जवळपास घोषणा झालेलं पण कधीच न निघालेलं हस्तकहे फक्त कवितांचं नियतकालिक, पुन्हा घोषित होऊन कधीच न निघालेलं कथाली’, आणि त्या आधी दुसर्‍या पर्वात सुरू करून ओळीनं निघालेले अभिरुचीचे ९ अंक एवढं अशोक शहाणे यांचं वाङ्मयीन कार्य आत्ताच्या पिढीला माहीत आहे की नाही, शंकाच आहे. पण माझ्यासारख्या कवितेवर प्रेम करून निष्ठापूर्वक जगणार्‍या त्या काळच्या तरुणांना अशोक शहाणे यांनी बरंच काही दिलं होतं. निखळ यादीच द्यायची तर अथर्व’, ‘असोमधून अशोकनं शक्ती चट्टोपाध्यायबरोबरच ज्यांचं साहित्य मराठीत आणलं ते कवी-लेखक जीवनानंद दास- उत्पलकुमार बसू- तारापद राय- शैलेश्वर घोष- सुरंजन चटोपाध्याय- प्रदीप चौधरी- वासुदेव दासगुप्त- सुभाष घोष इत्यादी. ही सगळी नावं १९६२ ते १९६५ च्या काळात हंग्री जनरेशनम्हणून गाजलेल्या विद्रोही वाङ्मयीन चळवळीशी संबंधित होती. अशोकनं अशी अमेरिकेतली बीट जनरेशन’, बंगालची हंग्री जनरेशनम्हणजे भूखी पिढी, आणि मराठीतली संतप्त लेखकांची पहिली पिढी यांची नीट संगत लावून मराठी लोकांसमोर आणली. बीट जनरेशनचा अ‍ॅलन गिन्सबर्ग शक्तीदाचा मित्र, शक्तीदा अशोकचे मित्र, असा हा प्रकार होता.
***

चंद्रकान्त पाटील
चंद्रकान्त पाटीलांनी लिहिलेल्या शक्तीदाबद्दलया लेखातील मजकूर.

Tuesday, November 16, 2010

Monday, November 15, 2010

एक फोटो

पिकासोला हातात घेऊन बसलेल्या शहाण्यांचा फोटो. 
त्यांचा फोटो काढायचा प्रयत्न करताना दिसतायत ते अतुल दोडिया. 
नि हा फोटो  रेखा शहाणे यांनी काढला.

अजून एक फोटो

वृंदावन दंडवतेंनी काढलेला शहाण्यांचा फोटो.

Saturday, November 13, 2010

अशोक शहाण्यांची पंच्याहत्तरी

- नामदेव ढसाळ

('सर्वकाही समष्टीसाठी' या सदरात १३ फेब्रुवारी २०१० ला प्रसिद्ध झालेला मजकूर)

'खरं बोललं की सख्ख्या आईलाही राग येतो' अशी मराठीत म्हण आहे. आमचे ज्येष्ठ मित्र अशोक शहाणे खरे बोलण्यात वस्तादच आहेत. खरं म्हणजे सत्य. जस्सं आहे तस्सं. या असल्या 'खरं' बोलण्यातच चिक्कार शत्रू आपण निर्माण करतो हे खरं बोलणा-याच्या गावीही नसतं. अशोकने आज पंच्याहत्तरी गाठली. खरं बोलण्याचे त्याने डोंगरच डोंगर उभे केले. मग तुम्ही म्हणाल, च्यायला! या अशोक शहाण्यानं जणू उभं जगच आपलं शत्रू करून सोडलंय. यात गंमत अशी आहे पाहा- एवढे करून नावालाही कुणी अशोकचा आजवर शत्रू झाला नाही. आचरट, आतरंगी मूल जसं आई-बापांना छानपैकी आवडत असतं. अशोक ज्या लोकांच्या संपर्कात किंवा जे लोक अशोकच्या परिघात सापडतात त्यांची अवस्था आतरंगी मुलाच्या आई-बापासारखीच होते. सत्यान्वेषी सत्यप्रिय माणसं सहन करण्याची ही ताकद हळूहळू प्रत्येकात येतच असते. एरवी सत्य म्हणजे सापेक्षच गोष्ट. ज्याला आपण सत्य म्हणून संबोधलेलं असतं. ते असत्यही असू शकते. भाषासंज्ञेचा छान वापर करून उत्क्रांतपणाच्या वाढीत माणसाने सत्याची व्याख्या केली असेल. प्रमाण आणि कसोट्यांवरून सत्याची केलेली व्याख्या आपण धरून चालतो की याबाबत अमुकअमुक यास सत्य म्हणतात. पण त्या सत्याच्या व्याख्येलाच असत्याची व्याख्या माणसाने पहिल्यापासून म्हटले असते तर त्या सत्याला आपण असत्य म्हटले असतेच की. ही अशी शब्दार्थाची, त्याच्या व्याख्येची छान फिरवाफिरवी ज्याला करता येते- अशा फिरवाफिरवीत जो निष्णात असतो तो प्रत्येक जण मला अशोक शहाणेच वाटत राहतो. धडक, तिरकस चिमटे काढत बोलणारा प्रत्येक जण अशोक शहाणेच वाटत राहतो. असो.

अशोकच्या सत्यान्वेषी अभिवृत्तीपेक्षा मला आवडतो तो त्याचा मनुष्यवेल्हाळ स्वभाव. त्याच्या बोलण्या-चालण्यातून मोकळं-ढाकळं वागण्यातून त्याच्या संपर्कात येणारा माणूस त्याच्याशी कायमचा जोडला जातो. त्यात कवी, लेखक, कलावंत, माणसंच असतात असं नाही तर सर्वसामान्य माणूस त्याच्यासाठी अजीज असतो. एक विशेष गोष्ट तुमच्या ध्यानात आणून द्यायला हरकत नाही. कला, साहित्य क्षेत्रातलं मक्तेदारीचं अभिजनत्व नाकारून त्यातल्या सहज सरळ सोपेपणाला सर्जनशील अभिव्यक्तीची उपजत जाण असलेला अशोक अक्षरवाङ्मयात काम करणा-यांना प्रिय असतो. तसाच यासाठी अनभिज्ञ असणा-यांना तो या सर्वांची गोडी लावून जातो. ही ग्रेट गोष्ट अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणा-या महाभागांनाही जमत नाही. कारण त्यांची ज्ञानोपासना एकार्थी मर्यादितच असते किंवा एककल्ली असते. ज्ञानोपासनेच्या अर्थाने अशोक बाप माणूसच म्हटला पाहिजे. माझ्या बायकोने यापूर्वी दिलीप चित्रेला चालत्याबोलत्या विश्वकोशाची उपमा दिली होती. अशोकला अशा उपमेत डकवून मी त्याचा जगड्व्याळपणा छोटा करू इच्छित नाही. अशोक ज्ञानसंपन्न माणूस आहे, पण प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या अवडंबराने त्यातले माणूसपण मोडून गेलेले नाही. ते अधिक मनुष्यकेंद्री आणि अधिक मानवीय झालेले आहे. म्हणून त्याला ज्ञानाचा दंभ जडलेला नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी त्याची वृत्ती नाही. ज्ञानी मनुष्य उभे जग जोडतो. चराचर जोडतो. अशोकचे वाङ्मयीन शिष्यत्व पत्करणारी माणसे मात्र अशोकचा हा वारसा पेलू शकलेली नाहीत. ज्ञानाच्या दंभात ती एवढी अमानुष झालेली असतात की, अखेरी ती पाहता पाहता मनुष्यद्वेष्टी होऊन जातात. अशोकबरोबरच्या वाङ्मयीन असो अथवा गैरवाङ्मयीन चर्चा मनाला आल्हाद देऊन जातात. ज्ञानजिज्ञासेच्या अर्थाने सुखावून जातात. अशोक स्वतःकडे, मित्रांकडे, जगाकडे, जगरहाटीकडे भाष्यकारांच्या नजरेतून बघत नाही. जगण्यावर अतोनात प्रेम असलेल्या आस्थेतून तो पाहतो. आज अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणून त्याच्या आप्तजन, मित्रांनी जागरण घातले. खरे तर चौसष्ट-पासष्टपासून मी अशोकला पाहत आलो. पहिल्यांदा जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो मला वय वर्षे शंभराचा वाटत आला. माझ्या बायकोने तर त्यावर छान कोटी केली. ती म्हणाली, काय म्हणावं, अशोकच्या मित्रांना अशोक पंच्याहत्तर वर्षांचा झाला म्हणतात म्हंजे या लोकांनी शंभराकडून उलटी गिनती सुरू केली की काय! इतुका न मी म्हातारा, वय पाऊणशे नव्हे शंभर वर्षे जणू!

अनियतकालिकांच्या चळवळीचे अशोकला पायोनियर म्हटले जाते. एस्टॅब्लिशमेंटविरुद्ध त्याने वाङ्मयीन चळवळ उभी केल्याचे म्हटले जाते. याविषयी अशोकची मोकळी-ढाकळी मते. चंद्रकांत खोतप्रणित लघुनियतकालिकांच्या पहिल्या पर्वातील पाचव्या अंकात खोताने तयार केलेल्या प्रश्नावलीच्या अनुरोधाने अशोकची घेतलेली मुलाखत जिज्ञासूंसाठी डोळ्यातील अंजन ठरावे. नाना काकतकरांमुळे अशोक अनियतकालिकांच्या उपद्व्यापात सापडला. याचे मनोरंजक अशोकच्याच शब्दातले वर्णन लघुनियतकालिकांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. बांधिलकी, बंडखोरी, संतप्त पिढी वगैरे शब्दप्रयोग अनियतकालिकांच्या चळवळीला लावले गेले त्यात काही राम नव्हता असे अशोकचे म्हणणे. त्याचे म्हणणे एवढेच की, त्या दरम्यान जे साहित्यिक मूल्याविषयी, अभिव्यक्तीविषयी अवडंबर माजवले जात होते ते तोडून साहित्य सर्जन व्यवहारात मोकळे-ढाकळेपणा आणणे एवढेच उद्दीष्ट माझ्यासमोर होते, असे अशोकने 'अबकडइ'च्या प्रश्नोत्तरात म्हटले आहे.

अनियतकालिकांच्या चळवळीत अशोक ओढला गेला नाना काकतकरांमुळे. गांधी वधानंतर काकतकरांना आपले गावशीव सोडून मुंबईत यावे लागले होते. बाबुराव अर्नाळकरांची रहस्यमय कादंबरी विभागशः मासिकात छापून ज्या मासिकाचे नाव 'रहस्यरंजन' होते ते चालवले जात होते उदरनिर्वाहासाठी. याशिवाय खानावळीचा काकतकरांचा धंदा होता. या 'रहस्यरंजन' मासिकाचे संपादन काही कारणे सदानंद रेगे करीत असे. रवींद्रनाथ टागोरांवर अंक काढण्यासाठी सदूने 'रहस्यरंजन'च्या कंपूत अशोकला घेतले आणि अशोक अनायासे अनियतकालिकांच्या चळवळीशी जोडला गेला. अशोकचे बंगाली भाषेवरले, वाङ्मयावरले प्रेम असे कामी आले.

'रहस्यरंजन'नंतर 'अथर्व' या नियतकालिकाचा एकच अंक त्यानंतर तीन-चार वर्षांनी 'असो' या लघुनियतकालिकाची सुरुवात झाली. १४ अंक निघाले. हा लघुनियतकालिकांचा सव्यापसवव्य व्यापार अशोकला लिट्ल मॅगझिनचा पायोनियर बनवून गेला. खरे तर 'रहस्यरंजन' असो अथवा 'अथर्व' या अगोदर दिलीप चित्रे, रमेश समर्थ, मन्या ओक, भाऊ पाध्ये आदींना घेऊन अशोकने 'शब्द'चा अंक काढलाच  होता. नुसत्या 'शब्द'चा संदर्भही अशोकला या चळवळीचा पायोनियर बनविण्यास पुरेसा आहे. काहीही असो. या चळवळीला सैद्धांतिक भूमिका नव्हती. या मल्लिनाथीत आपल्याला रस नाही, परंतु या चळवळीमुळेच मराठी वाङ्मयातील अभिजनवृत्ती ही पराभूत झाली. याचे सर्व श्रेय या चळवळीला जाते. अशोकने या चळवळीच्या भाष्यकाराची भूमिका जरी वेळोवेळी नाकारली असली तरी मराठी साहित्यातील कोंडी या लघुनियतकालिकांमुळे फुटली. पुरोगामी साहित्य चळवळ असो अथवा दलित साहित्याची चळवळ अथवा विद्रोही साहित्याची चळवळ, लघुनियतकालिकांमुळे जोर धरू शकली.

Friday, November 12, 2010

लोकटा

- अंबरीश मिश्र
 
काही माणसांवर लिहिणं शक्य नाही असं लक्षात येतं. मग आस्ते आस्ते अशा 'नेमेसिस' मंडळींची एक यादी आपसूकच तयार होते. माझ्याकडेही अशी एक लिस्ट आहे. त्यात पहिलं नाव अशोक शहाणेचं आहे.

एखाद्यावर आपण लिहितो म्हणजे आपण नेमकं काय करतो. तर गोळीबंद मजकुरात त्या माणसाला कापून-छाटून बसवतो. पानांच्या बिस्तऱ्यात त्याला कोंबतो. अशोक असा मावत-बिवत नाही कुठे अन् कशात. शब्दांचे खिळे उसवून अन् पॅऱ्यांच्या पायऱ्या पायऱ्या धाडधाड उतरून तो निघूनही जाईल. एशियाटिकच्या रस्त्यानं. तरातरा.

कसं काय लिहिणार अशोकवर?

दुसरं, तो एकदम ताजा माणूस आहे. मुसलमान लोक गुलगुले बनवतात, तसा. कढईतनं सरळ तोंडात. लेखाचे सोपस्कार पुष्कळ. तुम्ही लिहिणार. मग तो लेख उपसंपादकाच्या टेबलावर जाऊन पडणार. बराच वेळ पडून राहणार. मग कंपोजला जाणार. मग 'स्पेल-चेक' किंवा 'प्रूफिंग.' मग पानावर चिकटणार. सगळं शिळं होऊन जातं मग. अशोकला बासी खपत नाही. तो 'कियानी'तल्या खारीसारखा.

त्याच्यावर लिहिण्यापेक्षा त्याला फोन करायचा. किंवा 'एशियाटिक'मध्ये जाऊन भेटायचं. दोन-अडीच तास त्याच्याकडनं मिळेल तेवढं ऐकायचं. कॉफी प्यायची की तो चर्चगेटची वाट धरणार. आपण ऑफिसचा मार्ग धरायचा. तो गर्दीत हरवून जाणार. आपणसुद्धा.

गर्दीतला एक अशोक.

लाखों में एक असा अशोक. भन्नाट काँबिनेशन.

पण हे जमवता येत नाही. ते होऊन जातं.

गप्पा हा अशोकचा पासवर्ड. तो मारला की, 'एण्टर' करायची खोटी. की सुरू होते एक अद्भुत मुशाफिरी. अनेकांना बरोबर घेऊन अशोक हा प्रवास करतोय. मीही असतो अधनंमधनं. पुस्तकं, छपाईकला, संगीत, राजकारण, कविता, सिनेमा अशी तीर्थस्थानं घेत घेत ही वारी सुरू असते.

मी अशोककडे जातो ते बेसिकली काऊंटर-पॉईंटसाठी. मी बातमीदारी करतो. या धंद्यात एक वांधा असतो. जे काही घडत असतं त्याच्याशी बातमीदार एकदम खेटून उभा असतो. सगळा धूर नाका-तोंडात जातो. किंवा सगळी चमक-धमक दिपवून टाकते. मग कसलीच म्हणून सुसंगती लागत नाही. आपलं तेच खरं असं पुढे पुढे व्हायला लागतं. दुसरी बाजू लक्षातच येत नाही. यावीशी वाटत नाही. तर, ही दुसरी बाजू अशोकची असते.

अशोकचं सगळंच मी घेत नाही. त्याची गांधींवर प्रचंड श्रद्धा. अन् तरीही 'समाजाचं आपण काही देणं-बिणं लागत नाही. समाजाशी आपला काही वास्ता नाही' असं तो मानतो. हे मला नाही पटत.

गंमत म्हणजे समोरच्याला काय पटतं, काय नाही याच्याशीही अशोकचा वास्ता नसतो. त्याला जे म्हणायचंय ते तो मांडतो. समोरच्याला पटलं म्हणून तो खूष नाही, नाही पटलं याची खंत नाही. हे मला नदीसारखं वाटतं.

अशोकमध्ये अवाढव्य ऊर्जा आहे. आगीचा किंवा चाकाचा शोध लावलेल्या माणसांमध्ये अशीच ऊर्जा असणार. मन नितळ, स्वभाव बेरका, त्याच्या करड्या नजरेतनं काहीच सुटत नाही. बडेजाव, समारंभीय दिमाख अशा पोकळ गोष्टींचा त्याला राग येतो. 'लोणी लावून' आपला उल्लू सीधा करण्याची वृत्ती त्याला वैताग आणते. अशा वेळी अशोक आपलं खास हत्यार काढतो. खिल्लीचं. अशोक मस्त फिरक्या घेतो. पण खाजगी बदनामी, व्यक्तिगत आकस अजिबात नाही. एखादा लेच्यापेच्या असं जगतो म्हणाला तर त्याच्या एका विशिष्ट अवयवातनं धूर निघू लागेल आणि १०१ला फोन करण्याची वेळ येईल.

अशोक आणि मी एका सायंदैनिकाचं काम पाहत होतो. दहा वर्षांपूर्वीचं हे सांगतोय. ऑफिसची, कामाची वेळ अशोक काटेकोर पाळायचा. सगळा अंक एकजिनसी असावा असा त्याचा आग्रह असे. रोजच्या घिसाडघाईत ते शक्य नसायचं.

अशोक शनिवारच्या पुरवणीची सगळी उस्तवार काढायचा. पुरवणी आखायचा. प्रत्येकाला विषय वाटून द्यायचा. व्यवस्थित 'ब्रीफ' करायचा. मग हे सगळं सुनील कर्णिक सुविहित मार्गी लावायचा. पुरवण्या सुरेख निघायच्या. खाणं-पिणं, शॉपिंग, गिर्यारोहण, सहली- पर्यटन, फॅशन हे विषय हल्ली नियमित वाचायला मिळतात मराठी पेपरांमधनं. अशोकने दहा वर्षांपूर्वी हे सगळं सुरू केलं होतं.

त्याला लिहायचा कंटाळा. मनावर घेतलं तर मात्र तब्येतीनं लिहायचा. आपल्या 'कट- ग्लास' शैलीत. त्याची अक्षरं मराठी अन् इंग्रजीसुद्धा- आयटॅलिक्ससारखी वाटतात. ब्यूक गाडी जाते तसं अक्षरांचं चलन. लेख झाला की हेडिंग , स्लग, टाईपसाईज वगैरे सूचना लिहून द्यायचा.

कडधान्याला असतो तसा अशोक भाषेला एक मोड काढतो. ती खरी त्याची खूबसुरती. 'भिजकी वही'तली कविता असं तो म्हणणार नाही. 'भिजक्या वही'तली कविता असं म्हणेल. 'अजिबात'चं 'आजाबात', 'जा'चं 'जावा' अशा गमती तो करत असतो. अशोकचं मराठी झणझणीत आहे.

तीनेक वर्षांपूर्वी बांगलादेशचा एक लेखक मुंबईत आला होता. मी आणि अशोक त्याला भेटायला गेलो. अशोक, तो लेखक आणि त्याची बायको असं तिघांचं दोन-अडीच तास थेट बंगालीत सुरू होतं. अशोकचं आडनाव शहाणोपाध्याय असावं असं तेव्हा वाटलं.

अशोकला वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला. हा जर 'जीवनगौरव' स्टाइलचा पुरस्कार असेल तर अशोकची प्रतिक्रिया मला त्याच्याकडनं ऐकायचीये. आपल्याकडे सर्वसाधारपणे मोडीत निघालेल्या म्हाताऱ्यांची 'जीवनगौरव' पुरस्काराच्या विटेवर प्रतिष्ठापना केली जाते. अशोक सातारचा असला तरी तो म्हातारा नाहीये. अन् दुसरं, 'कर कटावरि ठेवूनिया' विटेवर उभा तो कधीच राहायचा नाही. तो वीट भिरकावणारा आहे.

'मौज' परिवार ही 'बरी' माणसं आहेत असं अशोकचं मत आहे. प्रभाकरपंत, मुकुंद, संजय भागवत मंडळींचंही अशोकबद्दल 'एक बरा माणूस' असं म्हणणं बहुधा असणार. 'लेख बरा आहे' असं 'मौज' ने म्हटलं की, पोटात गोळा येतो. 'बरा' म्हणजे उत्तम, फार चांगला, चांगला की ठीक आहे? मायकल जॅक्सनवरचा माझा एक लेख अशोकला असाच 'बरा' वाटला होता. 'मौज' आणि अशोक दोघांनाही 'सुपरलेटिव्हज्'चा उबग.

तर मग वि. पु. भागवत पुरस्कार हा एक 'बरा' पुरस्कार एका 'बऱ्या' माणसाला मिळाला असं आपण म्हणू.

दुर्गाबाई, अशोक, अरुण कोलटकर, नेमाडे, चित्रे, रघू दंडवते, म. वा. धोंड, भाऊ पाध्ये या मंडळींनी साठोत्तर महाराष्ट्राला अनेक उज्ज्वल आयाम दिले. समासाबाहेर राहिलो याची खंत या मंडळींनी कधीच केली नाही. ढोल-नगाडेही वाजवले नाहीत. ही सगळी माणसं मराठी भाषक म्हणून जन्माला आली आणि महाराष्ट्र हे आपलं कार्यक्षेत्र आहे असं समजून आपापलं काम करत राहिली या गोष्टीवर आणखीन वीसेक वर्षांनंतर विश्वास बसणार नाही अशी आपली सांस्कृतिक- वैचारिक दैना आजच्या घडीला आहे.

व्रतस्थ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी एका लेखात 'नको तितके सत्त्वशील' असं अशोक आणि 'लिट्ल मॅगझिन' चळवळीतल्या इतर विद्रोही कवींचं वर्णन केलंय. खरंय ते. म्हणूनच केव्हा केव्हा वाटतं की, 'निराशेचा गाव / आम्हांसी आंदण' अशी हताशा या पिढीनं अनुभवली असणार. अशोक तसं कधी बोलला नाही. तरतरीत, तुडतुडीत असा तो. जगण्याला भिडायचं एवढंच त्याला ठाऊक.

ढ्ढ ष्श्ाह्वद्यस्त्र द्धड्डह्मस्त्रद्य 4 2 ड्डद्बह्ल द्घश्ाह्म द्यद्बद्घद्ग. ढ्ढ 2 ड्डठ्ठह्लद्गस्त्र ह्लश्ा ह्मह्वठ्ठ ह्लश्ा 2 ड्डह्मस्त्र द्बह्ल 2 द्बह्लद्ध श्ाश्चद्गठ्ठ ड्डह्मद्वह्य.

हे मे वेस्टचं म्हणणं अशोकला तंतोतंत लागू पडतं.

अशोक मे वेस्टसारखाच.

एक भन्नाट, प्रामाणिक आणि मिष्किल इसम- चुकलो, लोकटा.
***
मे वेस्ट नक्की काय म्हणालेली, ते ह्या लेखात छापून आलं होतं ते काही खूप प्रयत्न करूनही सापडलं नाही. त्यामुळे वेबसाईटवर ते सापडलं तेव्हा जसं विचित्र दिसत होतं तसंच ठेवलंय.
***
('लोकटा' ह्या गौरकिशोर घोषांच्या कादंबरीचं शहाण्यांनी 'इसम' असं जे भाषांतर केलं त्याचा इथे संदर्भ आहे. काहींना माहीत नसेल म्हणून नोंदवलं.)
***
शहाण्यांना वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला २००४ साली तेव्हा 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये आलेला हा लेख. 

Sunday, November 7, 2010

लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीसंबंधी

- अशोक शहाणे

'अबकडइ' या चंद्रकान्त खोत यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकात १९७०च्या दरम्यान हा लेख प्रसिद्ध झाला होता. लिट्ल मॅगझिन्सच्या घडामोडींशी संबंधित मंडळींना एक प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून आलेले लेख या अंकात होते. लेखासाठीची मूळ प्रश्नावलीही खाली दिली आहे. त्या अंकातला हा लेख. 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या 'नपेक्षा' या शहाण्यांच्या पुस्तकातही हा लेख वाचायला मिळू शकेल.
__________________

१. तुम्हाला एखादे लिट्ल मॅगझिन काढण्याची गरज का भासली?
२. लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीचा लढा एस्टॅब्लिशमेंटविरुद्ध असल्यास त्यात नेमके काय करणे तुम्हाला अभिप्रेत आहे? गुळमुळीत न लिहिता स्पष्टपणे मांडा.
३. आजकाल बंडखोर पिढी, संतप्त पिढी असा शब्दप्रयोग करण्यात येतो. तुम्ही स्वत: यात समाविष्ट आहात काय? असल्यास तुमच्या बंडखोरीचा किंवा संतप्तपणाचा पुरावा काय?
४. मराठीतील लिट्ल मॅगझिन्सविषयी आजकाल जी टीका करण्यात येते, उदाहरणार्थ : यात काहीच क्रिएशन नाही, लिट्ल मॅगझिन्स कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे आहेत, या चळवळीतील लोक एग्झिबिशनिस्ट आहेत वगैरे वगैरे. तर या बाबतीत तुमचे स्पष्ट मत मांडा.
५. इतर भारतीय भाषांतील लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीच्या तुलनेने मराठीतील चळवळी संबंधाने तुम्हाला काय वाटते?
६. मराठीतील लिट्ल मॅगझिन्सच्या या चळवळीचे भवितव्य काय?
__________________

गोष्टी आपल्या घडतच असतात. आपण त्यातल्या एखादीत सापडतो. दरवेळी एखादीतच. आपण तिच्या वाटेत पडत असू. किंवा आपला कल असेल तसा. मग काही वेळा आपल्या पण हातातून गोष्टी घडत राहतात. मारे जोरातदेखील. अन् आणखी नंतर परत थंडपणा येतो.

इतक्यात योगायोगानं नाना काकतकरांशी गाठ पडली. त्यांना रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दीला खास अंक काढायचा होता. बंगाली जाणणारा म्हणून माझा प्रमाणाबाहेर बोलबाला झालेला. तेव्हा तो अंक त्यांना जमवून दिला अन् लगेच दोनतीन महिन्यात सदू रेगे विलायतेला चालला. तेव्हा रहस्यरंजनाची जिम्मेदारी माझ्याकडेच आली. अंकात काय काय पाह्यजे हे मला आपोआपच कळायचं. इतका मजकूर ठरला, आता आणखी इतका न् असा असा जमला की हा अंक होईल, वगैरे सहजगत्या लक्षात असायचं. त्यात माझी कर्तबगारी काहीच नव्हती. पण तरी अंक बरे निघाले बहुतेक. कारण काकतकरांनी तेवढ्यावरच खूष होऊन 'अथर्व'ची टूम पास केली. अन् पहिला अंक भलताच सुबक निघाला पण. आता त्याच सुमाराला 'रहस्यरंजन'चे पाय लटपटावेत अन् 'अथर्व'चा पहिला अंक शेवटलाच ठरावा - हे कुणाच्याच मनात नसलेलं होऊन बसलं.

एवढ्यावरच मी आपला मुंबैहून पुण्याला जाऊन घरी जवळपास हरीहरी करत बसलो होतो, तर 'अथर्व' छापणारे कृष्णा करवार न् 'अथर्व'वर चित्र काढून देणारे वसंत सरवटे ह्यांचा एक निरोप आला. परत काहीतरी काढा की. आपलं डोकं तर चालायचंच. तेव्हा 'असो'ची सुरुवात अशी झाली.

हे भलतंच गुळमुळीत वाटेल कदाचित. पण झालं ते निव्वळ असं. आम्हाला तर लिट्ल मॅगझिन म्हंजे काय माहीत नव्हतं. बाकीच्या मासिकातनं येणा-या गोष्टी-कवितांत काहीतरी एक नाही असं ठाम माहीत होतं. ते दुसरीकडे-नसलेलं-काहीतरी 'अथर्व-असो'मधनं हळूहळू आकार घेतंय अशी प्रामाणिक समजूत होती. त्याचं पुढं काय झालं असतं कोण जाणे. तितकी वेळच आली नाही.

पण म्हंजे हा लढाबिढा नव्हता. एस्टॅब्लिशमेंट वगैरे चौकटीत डोकं बसवून घ्यायला मी तरी तयार नव्हतो. तशी आमच्या हौसेला फारशी परदेशी पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळं तिकडले वाद, प्रश्न वगैरेंची डोकेदुखी कोण विकत घेणार. पण तरी चालू साहित्यातील जिवंतपणाची गैरहजेरी खटकत होती एवढं मात्र खरं. चालू साहित्याचा उदोउदो करणा-या लोकांच्याबद्दल एक प्रकारे कीव वाटायची पहिल्यांदा. पण ती काही त्यांच्या लक्षातच आली नाही वाटतं. कारण त्यांनी आपलं काहीच सोडलं नाही. मग जरासा राग पण आलाच. त्यांच्या बिनडोकपणाबद्दल. पण तेव्हा तरी ते तेवढ्यावरच राह्यलं.

ही प्रतिष्ठित मंडळी निव्वळ साहित्यासारख्या निरुपद्रवी प्रांतातच नाही तर छापखान्यासारख्या उपयोगी प्रांतात पण ठाण मांडून बसलेली आहेत. अन् शक्यतर ती आपल्याला काही छापून काढायला मज्जाव पण करतील वगैरे इतक्या गोष्टी अजिबातच डोक्यात आल्या नाहीत. प्रत्यक्षात तशा प्रसंगाशीच गाठ पडावी लागली. मग मात्र लगेच साहित्याचा निरुपद्रवीपणा पळाला. प्रतिष्ठित मंडळींच्या भलेपणाचे बंगले पण कोलमडून पडले.- थोडक्यात म्हंजे आम्ही कधीच जाणूनबुजून प्रतिष्ठितांच्या वाटेला गेलो नाही. तेच आमच्या वाटेला गेले. पहिला शहाणपणाचा धडा त्यांनी दिला. डोळे उघडले.

जसंजसं बघत जावं तसतशा ह्या मंडळींनी वाटा रोखलेल्या दिसत गेल्या. दरम्यान 'असो' तर बंदच करून ठेवलं होतं. कारण एखादी वाट मोकळी शोधून ते काढत पण राहता आलं असतं. पण त्यात स्वारस्य नव्हतं. कारण एव्हाना कळून चुकलं होतं की एवढ्यानं त्यांना ढिम्मदेखील होत नाही. ह्यांचे खुंटे साहित्याव्यतिरिक्त छप्पन ठिकाणी रोवलेले असतात. अन् ते ढिले केल्याखेरीज काही मोकळेपणा यायचा नाही. ही गोष्ट मला जेवढी स्पष्ट दिसते आहे ती अशी :

धरा कॉलेजातला एक पोरगा. प्रत्येक कॉलेज वर्षातनं एक अंक काढतं. त्याचा संपादक असतो कुणीतरी एक प्राध्यापक. बाकी मुलांचा एक अन् मुलींचा एक असे प्रतिनिधी पण असतात मंडळावर. हे बहुतेक भलतेच आज्ञाधारक. त्यामुळं अंक जसे निघतात तसे निघतात. प्रत्यक्षात कॉलेजातली मुलं वेगळी असतात. म्हंजे ह्या अंकात काय छापायचं ह्याची एक पठडी ठरून गेलेली आहे. त्यात बसणारं काही तुम्ही दिलंत तर छापलं जाईल. नाहीतर नाही. बाहेर तुम्ही आपलं असं एखादं अ-नियतकालिक काढून त्यात ते खुशाल छापा. कॉलेज चालवणारे लोक काही म्हणणार नाहीत. पण तुम्ही पैसे भरलेल्या न् कॉलेजच्या नावानं निघणा-या अंकात ते येणार नाही. एवढं तुम्हाला सोयीचं असलं तर त्यात त्यांची पण सोयच आहे. पण हीच गोष्ट तुम्हाला सोयीची नसली तर तुम्ही काय करता? तुम्ही कॉलेजचा अंक पोरांच्या ताब्यात द्या म्हणून आरडाओरडा केलात की ही साव मंडळी खवळतात की नाही पहा. असेच एकेक मोर्चे त्यांनी बांधलेले आहेत.

म्हंजे तुम्ही कविता लिहिल्यात तर ते तुम्हाला बक्षीसदेखील देऊ करतील. एका अटीवर. तुम्ही एखाद्या कचेरीत काम करत असाल तर तिथले साधे हिशेब तुम्ही मराठीत न लिहिता इंग्रजीत लिहिले पाहिजेत. कारण तुमची भाषा कविता लिहिण्याइतकी पुढारलेली असली तरी हिशेब लिहिण्याइतकी पुढारलेली नाही.

अशा रीतीनं एकदा का तुम्हाला कामाच्या ठिकाणी कुचकामी करून टाकलं की मग साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही थोडाफार धुमाकूळ घातला तर चालेल असं सरकारी धोरण आहे. अशानं साहित्याचं क्षेत्र आहे त्यापेक्षा निर्जीव बनत चाललं तर त्याचं काय एवढंसं. देश तर प्रगतीच करत राहील अन् साहित्याची बक्षिसं तेवढी वाढवली की प्रश्न मिटला. अन् हे बहुतेक लोकांना कबूल आहेसं दिसतं. 'आत्ता', 'फक्त', 'तापसी', येरू', 'श्रीशब्द', टिंब', 'अबकडइ' वगैरे चाळून बघा. जो तो कामाच्या जागी निमूट अन् बाहेर ह्या अंकातनं बंडखोर आहे. अन् ही एवढी बोलाची बंडखोरी त्याला समाधान देते. मला वाटतं, श्री. पु. भागवत हसत असतील हा प्रकार बघून गालातल्या गालात.

मग उघडच आहे की ह्यातल्या कुणी साहित्याबद्दल वेगळी भूमिका मांडलीच नाही. एक अपवाद 'वाचा'मधला नेमाडेचा लेख. त्यात पेच तरी स्वच्छ मांडलेला होता. असं काहीच उदाहरणार्थ, राजा ढाले आणि मंडळींच्या हातनं झालं नाही. ते विशेष नाही. पण त्यांना त्याची गरजच वाटली नाही. टीकावजा त्यातल्यात्यात राजानंच लिहिलं म्हणून त्याचा उल्लेख. राजानं आणखी एक जबरदस्त केलं. स्वत:च्या संपादनाखाली निघणा-या अंकांतच असली टीका छापली. बाहेरचे लोक तर बोलूनचालून जयवंत दळवींसारखे. तर कुणी एग्झिबिशनिस्ट वगैरे म्हणालं असेल तर नवल नाही.

दुस-या भाषांत हे काय कितपत चाललंय नीट कल्पना नाही. पण बंगाली लोकांच्यात जोश आपल्या दसपटीनं हे खरंच. वाराणसीचं 'आमुख' तर एकदम लालभडक झालेलं दिसतंय. म्हंजे ह्यांची बोलाची बंडखोरी प्रत्यक्षात येत चालली तर अशीच होणार की काय? मराठीत तर तूर्त सामसूम आहे. डोळे उघडे ठेवून का मिटून हा प्रश्न आहे.

पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही. एकामागोमाग एक- किंवा एकाबरोबर एक- अशी अनियतकालिकं निघत गेली. कारण 'असो' निघालं अन् अनियतकालिकं काढता येतात हे लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी पण काढली. पैशाच्या पाठबळाच्या प्रमाणात ती चालली, बंद पडली. एरवी त्यांच्यातनं काही निष्पन्न झालं असं तर काही वाटत नाही. ह्याच प्रकारानं निघत राहिली तर कुणाचं काही बिघडणार तर अर्थातच नाही. वेगळ्या प्रकारानं निघत राहिली तर मात्र रंगत येईल एवढं खरं.
***शांताबाई किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या 'किर्लोस्कर', 'मनोहर', 'स्त्री' या तीन मासिकांचा इतिहास 'कथा पासष्टीची' या पुस्तकात लिहिला आहे. या पुस्तकामधे शहाण्यांचा हा फोटो सापडला. फोटोचा इतर तपशील मात्र सापडू शकला नाही. शहाण्यांच्या बोलण्यात आल्यानुसार मुंबईमधे कुठल्यातरी कॉलेजात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळचा हा फोटो असावा. पण तरीही फोटोचे संदर्भ अस्पष्टच आहेत.

. . .असो. . .

'असो'चे एकूण अठरा अंक दोन टप्प्यांत निघाले. पहिला टप्पा बारा अंकांचा आणि दुसरा सहा अंकांचा.

Saturday, November 6, 2010

अरुण कोलटकरांची पुस्तके

अरुण कोलटकरांच्या पुस्तकांचा संग्रह भांडारकर इन्स्टिट्यूटला देण्यासाठी त्यांची विभागणी करताना अशोक शहाणे व रतन सोहनी, पुण्यातील वैश्विक आर्ट गॅलरीत, भास्कर हांडे यांनी केलेला व्हिडियो.

Friday, November 5, 2010

एका गांडूचें गाऱ्हाणें

- अशोक शहाणे

सात पावलांच्या दोन मुंग्या खुपसतात
     भरीव हवेची भसाड सोंड
     माझ्या हेवेदार दंडांत
          नि लक्ष पाकळ्या उमलतात सुकलेल्या

कुंपणावरली बाहुली खदखदते कृपण
     माझ्या काळ्याशार कानशिलांत
     जिथं अरक्षित अख्ख्या जख्खड जगांतलं ज्ञान
          नि एक दोर पिळला जातो तुटेल तुडुंब

आकाशांतल्या लख्ख चांदोबाला नाही सापडत
     विप्रलब्ध साप त्याचा मणी त्याची कात
     नि चिंचेचा आंकडा घालतो चार शून्यं
          माझ्या सदऱ्याच्या शिरावर


(‘शब्द’ अनियतकालिकाच्या १९५९च्या आसपासच्या अंकातील कविता)

गांडूचे गाऱ्हाणे

- अशोक शहाणे

खिशांत पावणे अठरा रुपये
रस्त्यानं जाणाऱ्या-येणाऱ्या
अगणित मुली वखवखलेल्या
अन् घालवायला अख्खं आयुष्य
पण तरी अगदीच कुचकामी
मी
          जग म्हणजे स्वप्नावस्था आहे
          असं शंकराचार्य म्हणालेयत
          असं ऍलन म्हणत होता
          अर्जुन हा शेवटचा पुरुष
          अन् बर्ट लँकॅस्टर कदाचित्
          पण आम्ही सगळेच मात्र
          सिद्धगांडू सगळेच्या सगळे
          फक्त हस्तमैथुन जमणारे
          हेंहि काही कमी नाही
          वेळ मारून न्यायला

('टिंब' अनियतकालिकाच्या मे १९६८च्या अंकात प्रसिद्ध झालेली कविता)

घरांतनं पळून जाऊन

- अशोक शहाणे

रिकाम्या रस्त्यावरनं एकटा पायीं जातों गाढवासारखा
खाली मान घालून पोंचायचं मुळी नसतंच कुठं
फक्त दिव्याचा खांब आला कीं वर बघून हसतों
आधीं एक सिनेमा बघितलेला नावाजलेला चांगला
का वाईट कांहीं कळत नाहीं फक्त
रिकाम्या रस्त्यावरनं एकटं पायी जात असणं न्
पोंचायचं नसणं कुठंच बरं वाटतं परत
मागं वळून पाह्यलं तर रस्ता असतो तसाच
दिवा गेला की आधींचा अंधार पण तसाच
अन् सिनेमा संपल्यावर आठवतं पडदासुद्धा तसाच
कोरा.

('वाचा' अनियतकालिकाच्या १९६८च्या आसपास प्रसिद्ध झालेल्या 'नव्या कविता' ह्या विशेषांकात प्रसिद्ध झालेली कविता.)

एक कविता

- अशोक शहाणे

आज पैसे मिळायचा वायदा होता
देऊन टाकले पैसे त्यानं
काळजीपूर्वक मोजत-मोजत
एक-एक तो मोजत होता
मी बघत होतों
माझे डोळे कसे अंधुक होऊन जात होते
मी पैसे घेतले
पैसे मला सारखे-सारखे मिळत नाहींत
महिन्या-महिन्याला मिळत नाहींत
म्हणून अंधुकलेल्या डोळ्यांनी मीं पैसे खिशांत कोंबले
परत भटकत चाललों
खिसा खाली असल्यासारखा
एरवींसारखा
पैशांच्या चणचणीनं गांजलेला
अन् तरी माझे डोळे अंधुक झाले होते
तो पैसे मोजत असतांना
अजुनी कदाचित् डोळे अंधुकच असतील
कळत नाहीं
अंगवळणी पडून गेलंय्
आज परत त्याच्याकडून चिठ्ठी घेऊन एकजण आलाय्
पैसे आत्तांच्या-आत्तां परत हवेत
दोन रुपये मीं खर्च केलेयत
पण पुरी रक्कमच परत करायला हवी
अन् ते दोन रुपये फेडण्याकरतां जन्मभर मला त्याचा बंदा गुलाम होऊन राह्यला हवं

माझे डोळे परत अंधुक होतायत

('असो'च्या १९६५मधल्या 'दोस्तांच्या कविता' विशेषांकातली कविता)

Wednesday, November 3, 2010

एक पिढी : नादान?

- त्र्यं. वि. सरदेशमुख

(सरदेशमुखांच्या 'भंजन रचनेसाठी' ह्या लेखातील इथे समर्पक ठरेल असा मजकूर.)


 जवळजवळ वीस वर्षांखाली अशोक शहाणे या तरुण जळत्या मनाने मराठी साहित्यावर क्ष-किरणनावाचा एक लेख प्रसिद्ध केला. गाजला त्या वेळी तो. सुस्तावलेली मने जागच्या जागी थोडी उलथीपालथी झाली. लेख लिहिणारा हात कलम करावा असा उद्गार निघाला. पेशवाईची कुजट आठवण देणारा. ‘काय विपरीत वाचाटपणा हा!’ एवढे स्वतःशीच म्हणत राहणे हा जिथला जास्तीत जास्त जिवंतपणा, तिथे शहाण्यांच्या शाब्दिक डिवचण्याने फार करून काय होणार? ‘तेज्या इशारती, तट्टा फोकावरी घेतीम्हणून रामदासांनी सांगून ठेवले आहे.एका विख्यात नगरीच्या एका प्रतिष्ठित साहित्य (व्यापार) संस्थेच्या दफ्तरी संस्था गांडू आहेअसे उघड्या कार्डाने कळवणारे एक प्रशस्तिपत्रक त्याच सुमारास दाखल झाल्याचे ऐकिवात आहे. आगेमागे पिल्लू पत्रिकांचा (‘लिट्‍ल मॅगझिन्सचा) अवतार आपल्या येथे झाला आणि त्यातल्या पहिल्या पहिल्या उद्रेकात तरुण पिढी स्वतःला अत्यंत कठोरपणे निखंदून घेत असल्याचे दिसून आले. तिचा कशावर आणि कोणावर विश्वास उरला नाही. कशाची आणि कोणाची श्रद्धा तिला राहिली नाही. बोलणारा तसा चालणारा कोणी आसपास दिसेना. मग तिने पाय कोणाचे वंदावे? घरीदारी, रस्त्यात, कचेर्‍यांत, शाळा-कॉलेजांत नुसता विसविशीतपणा, नुसती ढकलबाजी आणि भोंदुगिरी तिला जाणवू लागली. स्वतःच्या सामर्थ्याची नस सापडेना तेव्हा ही तरुण मुले स्वतःला गांडूम्हणवून घेऊ लागली. आपल्याला गांडूगिरीशिवाय काही साधत नाही, असे फिदीफिदी सांगू लागली. या दहा वर्षांत हा शब्द इतका सर्रास चलनी झाला आहे की, सध्या शाळा-कॉलेजांतील तरुण मुले एकमेकांना एरवीची किंवा लाडाची हाक मारताना याच शब्दाचा उपयोग करतात. त्यांना त्यात कसला अमंगळपणा, अनुचितपणा, शिवीपणा बिलकुल वाटत नाही. या शब्दातला अभद्रपणा जाऊन तो उदात्त अर्थाचा झाला म्हणावे की वापरणार्‍यांच्या जीवनात अभद्रता हीच अटळपणे स्वीकार्य होऊन बसली आहे? झाले तरी काय?
. . . मला तर असे जाणवत आले आहे की, ‘गांडूम्हणवून घेणारी ही तरुणांची पिढी फारच म्हणजे अगदी नको तितकी सत्त्वशील निघाली.

Sunday, October 31, 2010

'मर्यादित'ची अर्पणपत्रिका

शंकर ह्यांच्या 'सीमाबद्ध' या बंगाली कादंबरीचा अनुवाद शहाण्यांनी केला. 'मर्यादित' असे नाव असलेली ही अनुवादित कादंबरी १९७६मध्ये पुण्याच्या इनामदार बन्धू प्रकाशनाने प्रकाशित केली. अनुवादाला शहाण्यांनी जोडलेली अर्पणपत्रिका अशी-अर्पणपत्रिकेबद्दल शहाण्यांनी सांगितलेली गोष्ट, त्यांच्याच शब्दांत-

अर्पणपत्रिकेतले 'भाऊ' म्हंजे वि. स. खांडेकर. त्यांनी माझ्या मताने सर्वात उत्तम बंगाली कादंबरी मराठीत आणायला सांगितले होते. ती प्रकाशित करायची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. त्यांना सांगितलेली बंगाली कादंबरी अजून तशीच राहिलेली आहे. ती मराठीत आणणे एक दिव्यच आहे.
तेव्हाही आणि आताही. म्हणून राहून गेले.
अशी प्रत्येक गोष्टीमागे भलतीच गोष्ट निघते.

- अशोक

---
या गोष्टीत ज्या 'सर्वात उत्तम बंगाली कादंबरी'चा उल्लेख झालाय, ती कमलकुमार मजुमदार यांची 'अंतर्जली जात्रा'.

Monday, October 25, 2010

एक फोटो

अरुण कोलटकरांच्या 'The Policeman' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळचा फोटो- (डावीकडून) शहाणे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सुजित पटवर्धन, अविनाश गुप्ते आणि पुस्तकाच्या प्रती.

Saturday, October 23, 2010

शहाणे नावाचा 'वेडा'!

- जयंत पवार

(शहाण्यांची पंच्याहत्तरी त्यांच्या मित्रमंडळींनी साजरी केली ७ फेब्रुवारी २०१०ला. त्यानंतर ९ फेब्रुवारीला 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेला हा मजकूर. साभार इथे.)

अशोक शहाणे सात फेब्रुवारीला पंच्याहत्तर वर्षांचे झाले, हे विधान बुचकळ्यात टाकणारं आहे. म्हणजे ते जन्मनोंदीने झालेही असतील पंच्याहत्तर वर्षांचे, पण गेली कित्येक वर्षं, जे त्यांना पाहताहेत त्यांना ते पंच्याहत्तरीचेच वाटत आले आहेत. आणि त्यांचा प्रत्येक विषयाचा व्यासंग आणि त्यावर बोलण्याचा धबाबा उत्साह तर विशी-बाविशीच्या तरुणाचा आहे. म्हणजे शहाणे एकाचवेळी किमान दोन वयांमध्ये वावरत आलेत.

परवा गोरेगावच्या नंदादीप शाळेत त्यांच्या मित्रांनी त्यांना एका जागी चार-साडेचार तास जखडून ठेवलं आणि त्यांना आवडत नसताना त्यांच्या पंच्याहत्तरीचा अनौपचारिक सोहळा साजरा केला. शहाणेंचा वाढदिवस म्हटल्यावर भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, चंद्रकांत पाटील, अरुण खोपकर, रामदास भटकळ, शांता गोखले, जयंत धर्माधिकारी, सुनील दिघे असे बरेच जण आले. नाही नाही म्हणता सत्तर-ऐंशी शहाणेमित्र जमले!

अशा कार्यक्रमात उत्सवमूर्तीबद्दल भरभरून आणि भडभडून बोलायची स्पर्धा लागते, ज्याची शहाणेंना पहिल्यापासून अ‍ॅलर्जी. त्यांना वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कारप्रदान समारंभात त्यांच्याबद्दल बरंच बोललं गेलं. विशेष म्हणजे श्री. पु. भागवतही अचानक आणि खूप चांगलं बोलले. सत्काराला उत्तर देताना शहाणे म्हणाले, 'हे सगळं ऐकून मला वाटलं, मी मेलो की काय! थोडी विशेषणं मी मेल्यानंतर वापरायला राखून ठेवा.'

ह्याच पुरस्काराचं मानपत्र सुनील कर्णिकांनी लिहिलं होतं. शहाणेंना ते कसं वाटलं हे त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची कर्णिक वाट बघत होते. शहाणेंनी आधी कर्णिकांना सणसणीत शिवी घातली आणि मग म्हणाले, 'अरे तो पुरस्कार 'प्रास' प्रकाशनाला आहे, व्यक्तिगत मला नाही. हा माझा जीवनगौरव नव्हे. तो मी मेल्यानंतर करा.' त्यावर तितक्याच खडूसपणे कर्णिक म्हणाले, 'तो तर आम्ही करूच, पण तोवर आम्हीच राहिलो नाही तर पंचाईत व्हायची म्हणून तो आताच केला.'

तर असे हे शहाणे. त्यांचे मित्र तरी कसे सरळ बोलतील? एक चंद्रकांत पाटील सोडले तर सगळे चिमटे घेत, गुद्दे मारतच बोलले. पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रात बुद्धिमान लोकांनी एकत्र न राहण्याची परंपरा आहे. प्रत्येकाला वाटतं, आपण वेगळं काही तरी करावं. त्यामुळे आम्ही पुढे सगळे वेगवेगळे झालो. पण अशोक हा एकमेव माणूस आम्हा सगळ्यांशीच दुवा ठेवून होता.' शहाणे हे लिटिल मॅगझिन चळवळीचे पायोनियर. 'असो' हे लघुअनियतकालिक त्यांनी आणि नेमाड्यांनी सुरू केलं. मग 'आता' काढलं. 'असो'चे पाच अंक विकत घेतल्यावर 'आता'चा एक अंक फुकट मिळेल, अशी जाहिरात केली. 'मराठी साहित्यावर क्ष किरण' लिहून शहाण्यांनी साहित्यसृष्टीवर बॉम्बच टाकला. त्यात महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांबद्दल त्यांनी जे लिहिलंय ते वाचून अनेकांची फे फे झाली. नेमाडे म्हणाले, 'आम्ही दोघांनी पुणं सोडलं आणि लगेच पानशेतचं धरण फुटलं, हे प्रतिकात्मक अर्थानेच घ्यायला पाहिजे.' 'कोसला'मध्ये 'ते दोघे आले' असे वारंवार उल्लेख येतात, ते दोघं म्हणजे शहाणे आणि त्यांचे कपूर नावाचे एक मित्र होत, हे नेमाडेंनी सांगून टाकलं.

शहाण्यांनी आयुष्यभर जो वेडेपणा केला तो भल्याभल्यांना जमला नाही. समाजाचा तोल राखण्यासाठी प्रत्येक काळात असे वेडे शहाणे असावेच लागतात. आपल्यात एक तरी असा आहे.

Sunday, October 17, 2010

‘इसम’बद्दल पुलंनी लिहिलेलं

(गौरकिशोर घोष यांच्या ‘लोकटा’ या बंगाली कादंबरीच्या, शहाण्यांनी अनुवादित केलेल्या ‘इसम’या पुस्तकाचं परीक्षण पु. ल. देशपांड्यांनी लिहिलं होतं, त्यातला काही भाग. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये २२ जुलै १९८०ला प्रसिद्ध झालेलं हे परीक्षण दाद’ ह्या ‘मौज’ प्रकाशनाच्या पुस्तकात आहे.)

‘इसम’ आणि ‘मयत’ ह्या दोन अवस्थांखेरीज तिसरी अवस्था वाट्याला न येणार्‍या महानगरातल्या असंख्य इसमांतल्या एका इसमाची ही कथा आहे. भीषण आहे. करूण आहे. पण कारुण्य हसवण्यासाठी डोळ्यांना पाझर फोडण्याचा चुकूनही कुठे प्रयत्न नाही. मानवतेच्या प्रेमाचा गहिवर वगैरे भानगडी नाहीत. प्रभावासाठी कुठलीही चतुराई नाही. आणि मूळ बंगालीतली कादंबरी अशोक शहाण्यांनी मराठीत इतकी तंतोतंत उतरवली आहे, की प्रथम मराठीतून वाचून नंतर बंगालीतली वाचणार्‍याला गौरबाबूंनी अशोकच्या कादंबरीचे बंगालीत भाषांतर केलेय असे वाटावे. केवळ मूळ भाषा-शरीराशी परिचय, एवढ्या भांडवलावर भाषांतर करता येत नसते. मूळ लेखकाच्या भाषावस्थेशी तादात्म्य पावल्याशिवाय ही किमया साधत नसते. अशोक शहाणे भाषांतराला ‘अनुप्रास’ म्हणतात, खरे तर हे सहस्पंदन आहे.
. . . गौरकिशोर घोषांची ही साहित्यकृती मराठीत आणून बंगालीतल्या एका निराळ्याच ताकदीच्या लेखकाशी गाठ घालून दिल्याबद्दल ह्या कादंबरीचा वाचक अशोक शहाणेंना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. ‘अपवाद फक्त कथा-कादंबर्‍या केवळ टाइमपास म्हणून वाचणार्‍या वाचकांचा’ असे म्हणणार होतो. पण नाही अशा वाचकालाही आपल्या ‘इसम’पणाची जाणीव करून देणारी अशी ही मनाला डसणारी कादंबरी आहे.

Friday, October 15, 2010

अफलातून अशोक

- कमल देसाई
अशोक शहाणे केव्हा आणि कधी आला माझ्या आयुष्यात, हे आता आठवतसुद्धा नाही; इतका तो सहजपणे माझ्या आयुष्यात मिसळून गेलाय. रेखानं सांगितलं होतं, पत्र टाका हं, आम्ही वाट पहातो आहोत.अजून टाकतेच आहे मी पत्र. आत तस्लिमा घट्ट डोक्यात बसली आहे. आणि मराठी लेखकांचे वाभाडे काढत काढत आणखी काय काय लिहिणार आहे तो याचे मलाही कुतूहल आहे.
पण तो इथे तिथे, अवती भवती असणं आणि त्याचं बोलणं चालू असणं ही एक मजाच असते त्याच्या एकेक अफलातून आणि भन्नाट कल्पना म्हणजे विचारांचे नवे नवे धुमारे असतात. कशातही त्याला तिरपागडं दिसतंच आणि तो मग आपल्या खास अशोकी शैलीत खाड्दिशी मांडणार आपल्याला त्याचे विचार पटले नाहीत असं म्हटलं तर तो रागावतो किंवा समर्थन करतो, असं नाही परंतु मला नेहमीच त्याच्या या कशातही तिरपागडं दिसण्याचंआणि ते थेट अगदी थेट मांडण्याचं आकर्षण वाटत आलं आहे. छान, थेट मराठी कसं लिहावं हे तो खूप वेळा सहजपणे सांगून जातो. त्याचं असांकेतिक जगणं-असणं, जिथल्या तिथं अत्यंत कर्मठपणानं काही मूल्य सांभाळणं, आणि सदैव ताजेपणानं प्रत्यक्षाला भिडणं हे सर्वच जरा कठीण. मला खूप जण विचारायचे, तुम्हाला अशोकची आणि त्याच्या सभोवतालच्या मित्रमंडळींची भाषा समजते कशी?’ खरंच समजते का? तो त्याचा रोज एक नवा मित्र आणायचा. अतिगंभीरपणे त्याला ऊर्दू शिक म्हणायचा. कुणाला तरी गज्जलांच्या क्लासला जायला लावायचा आणि कोण चांगलं शिकवतं हे पण सांगून द्यायचा. ती बिचारी मुलं खरंच फार भक्तीनं ते करत. स्वतःही ऊर्दू बोलत, बंगाली बोलत, गजला म्हणत. सर्वांना गार गार करायचा. त्याच्या मंडळींची एक खास ढब असायची बोलण्याची. पुण्यात काय आणि मुंबईत काय, त्याने इतक्या हॉटेलांतून इतके नवे नवे काही खायला घातले की, मी ते सर्व विसरलेसुद्धा. पण कॉफी हौसची कोल्ड कॉफी वुइथ थिक क्रीममात्र कधी विसरले नाही.
या सगळ्यांबरोबरचा अशोक आणि मला भेटलेला अशोक एकच नसावा. तशी नसत असावी माणसं. ती वेगळी वेगळी होतात, असतात. त्याने मला झाडून सारी शंभू मित्राची बंगाली नाटकं दाखवली आणि सिनेमे तर इतके! ‘चारूलता त्याला फार आवडतो. मला नाही. गुरुदत्त डायरेक्टर म्हणून चांगला असेल, पण त्याला अभिनय नसावा असं मला वाटायचं. मला खूप मीनकुमारी किंवा वहिदा नाही आवडायची जशी की शबाना आवडते, नसिरुद्दीन आवडतो. ओम पुरी तर खूपच. पण एवढं असूनही तो असला की इतकी गंमत येते कशी? श्याम मनोहर नेहमी म्हणतो, एवढी काही मजा नाही, नाही?’ असं त्यानं म्हटलं की मला अशोक हमखास दिसतो. आणि तो म्हणजेच एक मजा असते असं वाटून जातं.
मी तेव्हा पुण्यात होते. कर्वे रोडवर जरा आत, एक गच्ची असलेलं छानसं घर मला मिळालं होतं. पण तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते. घुसमटही चाले माझी. अशोकला न सांगताच कळायचं, काहीही चौकशी न करता, प्रश्न न विचारता तो रोज रोज संध्याकाळी यायचा. मी म्हटलं, किती छान आहे ना गच्ची नि असं एकटंच संध्याकाळचं खूप बरं वाटतं नाही?’
म. . मग एवढी पा-पायपीट करून मी तु. . . तुझ्याकडे आ.. आलो ते क-कशा करता?’ आणि हसला. मला एकदम गुहेतून- खोल खोल गुहेतून वर वर येऊन मोकळं वाटू लागलं. आपण सुट्या होऊन आकाशभर पसरतो आहोत, असं झालं आणि मी मलाच सापडले. आम्ही दोघे मग गच्चीत तसेच पडलो. आणि मला तो आकाश वाचायला शिकवू लागला. एकदम सगळं आकाश नाही बघायचं. थोडा थोडा नेमून घ्यायचा भाग आणि तेवढाच रोज रोज वाचायचा. मग कळतं. सर्व आकाशसुद्धा.
कळतं काय डोंबल? तू एक सांगणार! मला तर सगळंच आकाश दिसतंय आणि आकाशात हरवायला पण होतंय. मी आताच हरवून गेले आकाशात. मी काही अर्जुन नाही बाबा.
भिवंडीला असताना तर नवीन काही सुचलं की एक बार ठासून, तोंडात गुळणी धरून यायचाच गडी. त्याला हे सगळं सुचायचं कसं कोण जाणे! तेव्हा टेपची सोयच नव्हती. एकदा म्हणाला, मीरा एक ग्रेटच हं. द्वापारातून उचलून एकदम खाड्दिशी कृष्णाला म्हणजे तिनं प्रत्यक्षच, आज. इथं प्रत्यक्ष केलं म्हणजे काय झालं काय! त्याची भाषा नाहीच जमत. थोड्या वेळानं दुसरं. आज गाडीत एक आंधळा म्हातारा आणि त्याची आंधळी म्हातारी होती. ती दोघं स्टेशनात शिरल्यावर आधी त्यांनी गाडीला नमस्कार केला. होय, होय, मायबाप हाय ती अपली.असं म्हणत गळ्यातला पंढरीचा फोटो सावरत डब्यालाही नमस्कार करून आत शिरली. आपलं सारं हे सगळं अफलातून हं. एकदम अफलातून. असा तो आला की कधी कधी घरात काहीसुद्धा नसायचे आणि स्वयंपाक करण्याचा मनस्वी कंटाळा. भाकरीचं पीठही शिळं फार. मी पार गोंधळले. कमळे तू ऊठ. तुझं काम नव्हे ते.आम्ही जेवायला बसलो, तर अशोक, भाकरी कडू लागते कारे, कडू झालंय रे पीठ.मी ओशाळलेली आधीच त्यानं स्वयंपाक केला म्हणून आणि त्यातूनच. . . तर तो म्हणतो कसा, पोटात गोड होतं ते सर्व. आपण दोघंही चांगले निरोगी, तगडे आहोत. चल खा तू.मी बघतच राहिले. याच्याजवळ ही सहजता आली कोठून?
१२५ वर्षांचं जुनं पंचांग शोधून त्यानं एकदाची माझी पत्रिका तयार केली. आणि काही तरी जिंकून आल्यागत आला. आल्यापासून, जर् रा चुकलं बघं. पाच मिंटं अधी जन्माला आली असतीस ना, तर राजाची राणी झाली असतीस. अगदी पाचच मिंटं आधी.मी चांगलीच वैतागले. पण सारा दिवस कानाशी भुणभूण. पत्रिका एकूण खूपच वाईट कशी आहे आणि किती आहे. मला वाटलं जगात मी एकटी एकच इतकं सर्व वाईट घेऊन जन्माला आले की काय? मी ऐकता ऐकता झोपले. तर उठवून सांगणार- ऐक तरी-‘ ‘मरू दे ना ती पत्रिका.’ ‘पण ऐक नापुन्हा सुरू. नि म्हणाला, बाकी कमळे, काही न ऐकता ऐकण्याचं सारं कौशल्य चेह-यावर ठेवता येतंय तुला, म्हणजे तू एकदम ग्रेटच असली पाहिजेस.
त्यानं केलेल्या चळवळीत मला भाग घ्यायला पत्र लिहायचा. पण लिहिणं मला फारसं आवडतच नसे. एकटं, स्वतंत्र आत्मसन्मानानं, आत्मप्रतिष्ठेनं आणि आनंदात जगणं हे जसं मला कठोरपणे करावंसं वाटलं. तसं मला लिहावसं वाटलंच नाही. लिहिणं झालं, ती देवाची कृपा, आपापतः ठरवून नाही. मी डांगेच्या कथांवर एक लेख लिहिला होता सत्यकथेत. तर म्हणाला, तुझा हा लेख. इतक्या काही वाईट नाहीत ह्या कथा. जरा बरा लिहितो तो. फार नाही. पण जरा.तसंच आता हे वाचून मला म्हणेल आपल्या जिवण्यांच्या कोप-यांना मुरड मुरड घालत, इतका काही मी वाईट नसावा. जरा बरा असेन.
मला धो धो हसू येईल.
***
'महाराष्ट्र टाइम्स'च्या १९९४च्या 'वार्षिक'मध्ये 'निर्भयस्पर्शी दुर्गाबाई नि अफलातून अशोक' हा लेख प्रसिद्ध झालेला. त्यातला दुसरा भाग हा.

Wednesday, October 13, 2010

अ‍ॅलन गिन्सबर्गच्या पुस्तकात

अ‍ॅलन गिन्सबर्गची बांगलादेशसंबंधीची एक कविता पहिल्यांदा शहाण्यांनी पोस्टर करून छापली होती.  ती कविता त्याच्या ज्या कवितासंग्रहात आहे त्यात शहाण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्येय. ते पान.

Acknowledging. . .

The fall of America: poems of these States, 1965-1971
 By Allen Ginsberg

***
अ‍ॅलन गिन्सबर्गची ही कविता होती September on Jessore Road

आणि तो बांगलादेशात गेलेला तेव्हाचा त्याचा एक फोटो

गिन्सबर्ग ते शहाणे व्हाया कोलटकर

अरुण कोलटकर अमेरिकेला गेले असताना अ‍ॅलन गिन्सबर्गला भेटले तेव्हा त्याने कोलटकर नि शहाण्यांना मिळून एक त्याच्या कवितांचं पुस्तक भेट दिलं. ते हे -

पानं उलटली की डाव्या बाजूला दिसतं त्या पानावर
गिन्सबर्गने काढलेलं हे खास त्याचं असं चित्र-

त्याच्या शेजारचं उजवीकडचं पान हे- 

उजवीकडच्या पानाचा वरचा भाग अजून जवळून-

त्याच पानाची खालची बाजू जवळून- 

***
***

Monday, October 11, 2010

शहाणे

- सुनील कर्णिक

(‘आपलं महानगरमध्ये पुस्तकाबाहेरचा पुस्तकवाला या सदरात १२. ७. १९९७ या तारखेला प्रसिद्ध झालेला मजकूर.)

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी अशोक शहाणेंची आणि माझी ओळख नव्हती. पण तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलेली एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आहे.
त्या काळी आम्ही अधूनमधून सर्वोद्य साधना साप्ताहिकाच्या कचेरीत जायचो. तिथे काम करणारा मेघश्याम आजगावकर एकदा म्हणाला, आम्ही विनोबांच्या भूदान चळवळीच्या मदतीसाठी मुंबईत एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. तिथे एक जण आला आणि माझ्या हातात एक कापडी पिशवी देऊन जाऊ लागला. मला काहीच कळेना. मी पिशवीत डोकावून  पाहिलं तर आत नोटा आणि चिल्लर भरलेली. म्हणजे ही त्याच्याकडून भूदानाला देणगी होती. मी घाईघाईने ओरडलो- अहो, तुमचं नाव तरी सांगा! तेव्हा ते वळून म्हणाले- अशोक शहाणे. आणि निघून गेले. . .
***
यानंतर खूप दिवसांनी मी शहाणेंना प्रत्यक्ष पाहिलं. मराठी संशोधन मंडळात एक दिवशी सकाळीच डॉ. सु. रा. चुऩेकरांच्या बरोबर ते आले. त्यांनी बिनइस्त्रीचा. थोडा चुरगळलेला काळा शर्ट घातलो होता आणि खाली तशीच गडद रंगाची पॅण्ट होती. बराच वेळ दोघांचं बोलणं चाललं होतं. बोलणं खास वाटत होतं. ते निघून गेल्यावर मी चुनेकरांना विचारलं- कोण हो हे? ते म्हणाले- अशोक शहाणे. नंतर त्यांनी शहाणेंबद्दल बरीच माहिती सांगितली.
पण मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकण्याची ताकद या माणसात असेल हे मला खरंच वाटेना.
***
त्या काळी संतप्त साहित्यिकांची लघु-अनियतकालिकं जोरात होती. अशोक शहाणे हे या संतप्त साहित्यिकांचे मठाधिपती मानलो जात. या सगळ्यांची प्रस्थापित साहित्यिकांशी कायम खडाजंगी चालू असे. एकदा कोणीतरी पुढाकार घेऊन या लघु-अनियतकालिकांबद्दल संग्रहालयात चर्चा ठेवली. राम पटवर्धन, प्र. श्री. नेरूरकर, अशोक शहाणे, असे अनेक वक्ते होते. बाकी सगळे जण वेळेवर हजर राहिले आणि काय बोलायचं ते बोलले. अशोक शहाणे मात्र आलेच नाहीत. नंतर प्र. श्री. नेरूरकरांनी रविवारच्या मराठ्यात सगळ्यांचा समाचार घेणारा लेख लिहिला. त्यात त्यांनी अशोक खरे शहाणे असा मथळा देऊन त्यांच्या गैरहजेरीची हजेरी घेतली होती.
*** 
याच काळात मी दुर्गाबाईंना भेटायला एशियाटिक सोसायटीत जाऊ लागलो, तेव्हा शहाण्यांशी वारंवार भेटी होऊ लागल्या. मी अर्थात फक्त ऐकण्याचंच काम करत असे. येणार्‍या-जाणार्‍याशी मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगालीत ते बोलत. त्यातला काही भाग मला कळत नसे. पण शहाण्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव आणि त्यांचे उच्चार इतके खास असायचे की बघत आणि ऐकत राहावंसं वाटायचं.
वरवर पाहता शहाणे अबोल वाटतात. पण एकदा बोलायला लागले की तासन् तास बोलतात. पाणिनीचं व्याकरण किती ग्रेट आहे यावर ते एकदा एशियाटिक सोसायटीच्या कॅण्टीनमध्ये तास-दीड तास माझ्याशी बोलले होते. अहो, मग तुम्ही याच्यावर पुस्तक का लिहीत नाही? असं मी विचारल्यावर ते सोड. एवढंच म्हणून त्यांनी तो विषय बंद केला.
***
एकदा मी पुण्याला जात होतो तेव्हा ते आणि त्यांचे परममित्र कृष्णा करवार मला गाडीत भेटले. मग पुढचे चार तास ते दोघं अनेक विषयांवर बोलले. त्यापैकी पुण्याच्या पटवर्धन बंधूंचं सुप्रसिद्ध संगम मुद्रणालय ओरिएण्ट लाँगमनन कंपनीच्या घशात कसं गेलं याची शहाण्यांनी सांगितलेली तपशीलवार हकिगत माझ्या कायमची लक्षात राहिली.
आणखी एकदा माझा मुक्काम पुण्यात होता, तेव्हा रात्रीच्या वेळी ते रस्त्यात दिसले. कुठून आलात? असं विचारलं तर सातार्‍याहून म्हणाले. माझ्या लॉजवर येता का? म्हणालो, तर उत्तर आलं- छे छे! इथे स्वतःचं घर असताना लॉजवर कोण राहील?मग तिथेच फूटपाथवर उभं राहून रात्री साडेदहा-अकरापर्यंत आम्ही गप्पा मारल्या. ते अधूनमधून बाजूच्या पानवाल्याकडून पान घेत होते. त्यामुळे की काय, गप्पा रंगतच गेल्या. . .
*** 
पुढे सांगोपांग वासूनाका नावाचं भलं-भक्कम पुस्तक प्रसिद्ध झालं. भाऊ पाध्येंच्या वासूनाकावर जे काही बरं-वाईट छापून आलं होतं ते सगळं या पुस्तकात एकत्र केलेलं होतं. मी त्यावेळी नवशक्तित होतो आणि या पुस्तकावर अशोक शहाणेंकडून लिहून घ्यावं असं मला वाटत होतं. कारण वासूनाका लिहिताना शहाणेंनी महत्त्वाच्या सूचना केल्या असं भाऊंनी म्हटलेलं होतं.
मी शहाणेंना जाऊन भेटलो. त्यांनी सांगोपांगवर लिहिण्याचं कबूल केलं. पुस्तक ताब्यात घेतलं. अमुक तारखेला मजकूर देतो म्हणाले.
ती तारीख उलटून बरेच दिवस झाले, तरी शहाणेंकडून मजकूर येईना. ते काही ना काही सबबी सांगत राहिले. लिहिलंय पण अजून पक्कं करतोय, आज लिहिलेलं घरी राहिलं, सध्या ते एकाला वाचायला दिलंय, वगैरे. मग एकदा म्हणाले, आता भाऊ पाध्येला वाचायला दिलंय. त्याने बघून दिलं की तुला देतो.
त्यांच्याकडून बाहेर पडलो तर समोर भाऊ पाध्येच भेटले. त्यांना विचारलं तर ते म्हणाले- अशोक थापा मारतोय. चल आपण त्याच्याकडे जाऊ.
तिकडे गेलो तर शहाणे नाहीसे झालेले.
अखेरपर्यंत त्यांच्याकडून ते परीक्षण मिळालं नाहीच.
त्यांनी का लिहिलं नाही, त्यांचं त्यांनाच ठाऊक.
***
मधे दिनांक नावाचं साप्ताहिक चालू होतं. त्याचे पहिले संपादक होते अशोक शहाणे. या साप्ताहिकात दिलीप चित्रेंचं चाव्या नावाचं सदर चालू झालं. त्याची शैली शहाणेंच्या शैलीशी इतकी मिळतीजुळती होती की चित्रेंच्या नावाने स्वतः शहाणेच ते सदर लिहिताहेत असा मला दाट संशय होता- आणि तसं मी शहाणेंना हटकलंही.
पुढे काही दिवसांनी त्या साप्ताहिकाच्या कचेरीत गेलो, तेव्हा शहाणेंनी मुद्दाम त्या सदराचं हस्तलिखित काढून मला दाखवलं आणि विचारलं- बघ, दिलीपचंच अक्षर आहे ना?
मला कबूल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
*** 
अशोक शहाणे पोटापाण्याचा उद्योग काय करतात?
अनेकांना हा प्रश्न पडतो.
शहाणे पैशांच्या विवंचनेत कधी दिसत नाहीत.
फक्त एकदा ते मला म्हणाले होते- मलाही पुस्तकाची कामं मिळाली तर बघ ना.
मी सहज त्यांना त्यांची अपेक्षा विचारली. तर ती आम्हाला मिळणार्‍या मोबदल्याच्या मानाने इतकी जास्त होती की बोलणंच खुंटलं.
***
काही वर्षांपूर्वी अनिल बांदेकर नावाचा नागपूरकडचा कवी तरूण वयात कॅन्सरने निधन पावला. त्याच्या मित्रांनी त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचं ठरवलं. रमेश पानसे, वासंती मुझुमदार, अशोक शहाणे वगैरेंचा त्यात पुढाकार होता. मौज प्रेसमध्ये संग्रह तयार झाला. प्रकाशन समारंभ ठरला. वासंती मुझुमदारांनी मंगेश पाडगावकरांना अध्यक्ष म्हणून बोलावलं. पोदार कॉलेजमध्ये समारंभ सुरू झाला- आणि पाडगावकर भाषणाला उभे राहताच शहाणे आणि त्यांचे आठ-दहा मित्र अचानक उठून सभा सोडून गेले! पाडगावकर ज्या प्रकारच्या कविता लिहीत होते त्याबद्दलची यांची ही नापसंती होती. पाडगावकरांनी अर्थातच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते संतप्त नव्हते आणि हे संतप्त होते, हा त्या दोघांमधला फरक होता.
***
शहाणेंच्या तोंडून निरनिराळे किस्से ऐकणं हा एक धमाल अनुभव असतो. गोविंद तळवलकरांबरोबरचा त्यांनी सांगितलेला एक किस्सा असा आहे-
भालचंद्र नेमाडे काही वर्षं इंग्लंडमध्ये होते. ब्रिटिश लोकांचे फार विचित्र अनुभव त्यांना आले. त्याबद्दल कुठे तरी लिहावं अशी नेमाडेंची इच्छा होती. म्हणून शहाणे त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवलकरांकडे घेऊन गेले. पण तळवलकर पडले पक्के ब्रिटिशधार्जिणे. ते म्हणाले, मी इथे संपादक असेपर्यंत तरी ब्रिटिशांच्या विरोधी मजकूर प्रसिद्ध होऊ शकणार नाही.
यावर शहाणेंनी त्यांना हसत हसत काय सुनावलं असेल? ते म्हणाले, तळवलकर, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, ब्रिटिश १९४७ सालीच हा देश सोडून गेले!’
*** 
मध्यंतरी मॅजेस्टिक बुक स्टॉलचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्या निमित्ताने मी प्रकाशन व्यवसायातील निरनिराळ्या लोकांच्या प्रतिक्रिया गोळा करत होतो. शहाणेंनी मला मॅजेस्टिकच्या संबंधातले सहा किस्से सांगितले, आणि वर म्हणाले, तुझी हिंमत असली तर हे सगळं पेपरात छाप.त्यातले तीन किस्से मी त्यांच्या नावाने छापले. उरलेले तीन छापण्याची माझी हिंमत झाली नाही, हे कबूल करायला पाहिजे. आता ते न छापलेले किस्से कोणते होते, हे मला विचारू नका. हिंमत असली तर शहाणेंनाच विचारा!   चार वर्षांपूर्वी आज दिनांक नावाचं सायंदैनिक सुरू झालं होतं. त्याचे पहिले सल्लागार संपादक होते अशोक शहाणे. त्यांच्या पत्रकारितेच्या कल्पना आणि तिथल्या इतरांच्या कल्पना यात इतकी तफावत होती की बर्‍याच वेळा धमाल उडे.
आज दिनांकची कचेरी होती दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये. एक दिवस शहाणे त्या मार्केटमधून कचेरीत येत होते, तेव्हा त्यांना ढीगभर झुरळं मारून टाकलेली दिसली. ते घाईघाईने वर आले आणि तिथे हजर असलेल्या वार्ताहरांना म्हणाले,
खाली मार्केटमध्ये जाऊन या. तुम्हाला काय दिसतंय ते सांगा.
त्या तरुणांचा घोळका मार्केटमध्ये फिरून आला.
काय बघितलंत?’- शहाणे
त्या बिचार्‍यांना बघण्याजोगं खास काहीच दिसलं नव्हतं.
असं कसं? मेलेल्या झुरळांचा ढीग बघितला नाहीत?
हो, पण त्यात काय विशेष. . .
अरे वेड्यांनो, तीच तर मोठी बातमी आहे!
आता यात बातमी काय, ते त्या पोरांना कळेना आणि यांना कसं सांगावं ते शहाणेंना कळेना! ती बिचारी ढीगभर झुरळं जिवानिशी वाया गेली.
***
गेल्या वर्षी आम्ही समकालीन संस्कृती नावाचं मासिक सुरू केलं. त्याच्या दिवाळी अंकात मी मौजेचे दिवस नावाचा मोठा लेख लिहिला. त्याची थोडीफार चर्चा झाली. मी लगेच हवेत तरंगू लागलो. मौज प्रकाशनाबरोबर शहाणेंचे संबंध बरीच वर्षं बिघडलेले आहेत- त्यामुळे त्यांना हा लेख वाचायला आनंद वाटेल, अशा समजुतीने मी तो अंक मुद्दाम त्यांना नेऊन दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्सुकतेने त्यांना फोन केला-
काय, बघितलात का अंक?
ते म्हणाले, हां- तुमच्या अंकातली ती प्रदीपने घेतलेली दिलीपची मुलाखत चांगली आहे.
पण माझा लेख बघितलात का?
नाही. . . तो नाही अजून बघितला. मग दोन दिवसांनी मी पुन्हा विचारलं- माझा लेख बघितलात का?
त्यांचं उत्तर तेच- नाही अजून.
तो अभिप्राय अत्यंत बोलका आणि अविस्मरणीय होता! हवेत तरंगणार्‍या मला त्यांनी अतिशय अलगद जमिनीवर आणलं होतं.

मैत्र