१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Friday, November 12, 2010

लोकटा

- अंबरीश मिश्र
 
काही माणसांवर लिहिणं शक्य नाही असं लक्षात येतं. मग आस्ते आस्ते अशा 'नेमेसिस' मंडळींची एक यादी आपसूकच तयार होते. माझ्याकडेही अशी एक लिस्ट आहे. त्यात पहिलं नाव अशोक शहाणेचं आहे.

एखाद्यावर आपण लिहितो म्हणजे आपण नेमकं काय करतो. तर गोळीबंद मजकुरात त्या माणसाला कापून-छाटून बसवतो. पानांच्या बिस्तऱ्यात त्याला कोंबतो. अशोक असा मावत-बिवत नाही कुठे अन् कशात. शब्दांचे खिळे उसवून अन् पॅऱ्यांच्या पायऱ्या पायऱ्या धाडधाड उतरून तो निघूनही जाईल. एशियाटिकच्या रस्त्यानं. तरातरा.

कसं काय लिहिणार अशोकवर?

दुसरं, तो एकदम ताजा माणूस आहे. मुसलमान लोक गुलगुले बनवतात, तसा. कढईतनं सरळ तोंडात. लेखाचे सोपस्कार पुष्कळ. तुम्ही लिहिणार. मग तो लेख उपसंपादकाच्या टेबलावर जाऊन पडणार. बराच वेळ पडून राहणार. मग कंपोजला जाणार. मग 'स्पेल-चेक' किंवा 'प्रूफिंग.' मग पानावर चिकटणार. सगळं शिळं होऊन जातं मग. अशोकला बासी खपत नाही. तो 'कियानी'तल्या खारीसारखा.

त्याच्यावर लिहिण्यापेक्षा त्याला फोन करायचा. किंवा 'एशियाटिक'मध्ये जाऊन भेटायचं. दोन-अडीच तास त्याच्याकडनं मिळेल तेवढं ऐकायचं. कॉफी प्यायची की तो चर्चगेटची वाट धरणार. आपण ऑफिसचा मार्ग धरायचा. तो गर्दीत हरवून जाणार. आपणसुद्धा.

गर्दीतला एक अशोक.

लाखों में एक असा अशोक. भन्नाट काँबिनेशन.

पण हे जमवता येत नाही. ते होऊन जातं.

गप्पा हा अशोकचा पासवर्ड. तो मारला की, 'एण्टर' करायची खोटी. की सुरू होते एक अद्भुत मुशाफिरी. अनेकांना बरोबर घेऊन अशोक हा प्रवास करतोय. मीही असतो अधनंमधनं. पुस्तकं, छपाईकला, संगीत, राजकारण, कविता, सिनेमा अशी तीर्थस्थानं घेत घेत ही वारी सुरू असते.

मी अशोककडे जातो ते बेसिकली काऊंटर-पॉईंटसाठी. मी बातमीदारी करतो. या धंद्यात एक वांधा असतो. जे काही घडत असतं त्याच्याशी बातमीदार एकदम खेटून उभा असतो. सगळा धूर नाका-तोंडात जातो. किंवा सगळी चमक-धमक दिपवून टाकते. मग कसलीच म्हणून सुसंगती लागत नाही. आपलं तेच खरं असं पुढे पुढे व्हायला लागतं. दुसरी बाजू लक्षातच येत नाही. यावीशी वाटत नाही. तर, ही दुसरी बाजू अशोकची असते.

अशोकचं सगळंच मी घेत नाही. त्याची गांधींवर प्रचंड श्रद्धा. अन् तरीही 'समाजाचं आपण काही देणं-बिणं लागत नाही. समाजाशी आपला काही वास्ता नाही' असं तो मानतो. हे मला नाही पटत.

गंमत म्हणजे समोरच्याला काय पटतं, काय नाही याच्याशीही अशोकचा वास्ता नसतो. त्याला जे म्हणायचंय ते तो मांडतो. समोरच्याला पटलं म्हणून तो खूष नाही, नाही पटलं याची खंत नाही. हे मला नदीसारखं वाटतं.

अशोकमध्ये अवाढव्य ऊर्जा आहे. आगीचा किंवा चाकाचा शोध लावलेल्या माणसांमध्ये अशीच ऊर्जा असणार. मन नितळ, स्वभाव बेरका, त्याच्या करड्या नजरेतनं काहीच सुटत नाही. बडेजाव, समारंभीय दिमाख अशा पोकळ गोष्टींचा त्याला राग येतो. 'लोणी लावून' आपला उल्लू सीधा करण्याची वृत्ती त्याला वैताग आणते. अशा वेळी अशोक आपलं खास हत्यार काढतो. खिल्लीचं. अशोक मस्त फिरक्या घेतो. पण खाजगी बदनामी, व्यक्तिगत आकस अजिबात नाही. एखादा लेच्यापेच्या असं जगतो म्हणाला तर त्याच्या एका विशिष्ट अवयवातनं धूर निघू लागेल आणि १०१ला फोन करण्याची वेळ येईल.

अशोक आणि मी एका सायंदैनिकाचं काम पाहत होतो. दहा वर्षांपूर्वीचं हे सांगतोय. ऑफिसची, कामाची वेळ अशोक काटेकोर पाळायचा. सगळा अंक एकजिनसी असावा असा त्याचा आग्रह असे. रोजच्या घिसाडघाईत ते शक्य नसायचं.

अशोक शनिवारच्या पुरवणीची सगळी उस्तवार काढायचा. पुरवणी आखायचा. प्रत्येकाला विषय वाटून द्यायचा. व्यवस्थित 'ब्रीफ' करायचा. मग हे सगळं सुनील कर्णिक सुविहित मार्गी लावायचा. पुरवण्या सुरेख निघायच्या. खाणं-पिणं, शॉपिंग, गिर्यारोहण, सहली- पर्यटन, फॅशन हे विषय हल्ली नियमित वाचायला मिळतात मराठी पेपरांमधनं. अशोकने दहा वर्षांपूर्वी हे सगळं सुरू केलं होतं.

त्याला लिहायचा कंटाळा. मनावर घेतलं तर मात्र तब्येतीनं लिहायचा. आपल्या 'कट- ग्लास' शैलीत. त्याची अक्षरं मराठी अन् इंग्रजीसुद्धा- आयटॅलिक्ससारखी वाटतात. ब्यूक गाडी जाते तसं अक्षरांचं चलन. लेख झाला की हेडिंग , स्लग, टाईपसाईज वगैरे सूचना लिहून द्यायचा.

कडधान्याला असतो तसा अशोक भाषेला एक मोड काढतो. ती खरी त्याची खूबसुरती. 'भिजकी वही'तली कविता असं तो म्हणणार नाही. 'भिजक्या वही'तली कविता असं म्हणेल. 'अजिबात'चं 'आजाबात', 'जा'चं 'जावा' अशा गमती तो करत असतो. अशोकचं मराठी झणझणीत आहे.

तीनेक वर्षांपूर्वी बांगलादेशचा एक लेखक मुंबईत आला होता. मी आणि अशोक त्याला भेटायला गेलो. अशोक, तो लेखक आणि त्याची बायको असं तिघांचं दोन-अडीच तास थेट बंगालीत सुरू होतं. अशोकचं आडनाव शहाणोपाध्याय असावं असं तेव्हा वाटलं.

अशोकला वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला. हा जर 'जीवनगौरव' स्टाइलचा पुरस्कार असेल तर अशोकची प्रतिक्रिया मला त्याच्याकडनं ऐकायचीये. आपल्याकडे सर्वसाधारपणे मोडीत निघालेल्या म्हाताऱ्यांची 'जीवनगौरव' पुरस्काराच्या विटेवर प्रतिष्ठापना केली जाते. अशोक सातारचा असला तरी तो म्हातारा नाहीये. अन् दुसरं, 'कर कटावरि ठेवूनिया' विटेवर उभा तो कधीच राहायचा नाही. तो वीट भिरकावणारा आहे.

'मौज' परिवार ही 'बरी' माणसं आहेत असं अशोकचं मत आहे. प्रभाकरपंत, मुकुंद, संजय भागवत मंडळींचंही अशोकबद्दल 'एक बरा माणूस' असं म्हणणं बहुधा असणार. 'लेख बरा आहे' असं 'मौज' ने म्हटलं की, पोटात गोळा येतो. 'बरा' म्हणजे उत्तम, फार चांगला, चांगला की ठीक आहे? मायकल जॅक्सनवरचा माझा एक लेख अशोकला असाच 'बरा' वाटला होता. 'मौज' आणि अशोक दोघांनाही 'सुपरलेटिव्हज्'चा उबग.

तर मग वि. पु. भागवत पुरस्कार हा एक 'बरा' पुरस्कार एका 'बऱ्या' माणसाला मिळाला असं आपण म्हणू.

दुर्गाबाई, अशोक, अरुण कोलटकर, नेमाडे, चित्रे, रघू दंडवते, म. वा. धोंड, भाऊ पाध्ये या मंडळींनी साठोत्तर महाराष्ट्राला अनेक उज्ज्वल आयाम दिले. समासाबाहेर राहिलो याची खंत या मंडळींनी कधीच केली नाही. ढोल-नगाडेही वाजवले नाहीत. ही सगळी माणसं मराठी भाषक म्हणून जन्माला आली आणि महाराष्ट्र हे आपलं कार्यक्षेत्र आहे असं समजून आपापलं काम करत राहिली या गोष्टीवर आणखीन वीसेक वर्षांनंतर विश्वास बसणार नाही अशी आपली सांस्कृतिक- वैचारिक दैना आजच्या घडीला आहे.

व्रतस्थ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी एका लेखात 'नको तितके सत्त्वशील' असं अशोक आणि 'लिट्ल मॅगझिन' चळवळीतल्या इतर विद्रोही कवींचं वर्णन केलंय. खरंय ते. म्हणूनच केव्हा केव्हा वाटतं की, 'निराशेचा गाव / आम्हांसी आंदण' अशी हताशा या पिढीनं अनुभवली असणार. अशोक तसं कधी बोलला नाही. तरतरीत, तुडतुडीत असा तो. जगण्याला भिडायचं एवढंच त्याला ठाऊक.

ढ्ढ ष्श्ाह्वद्यस्त्र द्धड्डह्मस्त्रद्य 4 2 ड्डद्बह्ल द्घश्ाह्म द्यद्बद्घद्ग. ढ्ढ 2 ड्डठ्ठह्लद्गस्त्र ह्लश्ा ह्मह्वठ्ठ ह्लश्ा 2 ड्डह्मस्त्र द्बह्ल 2 द्बह्लद्ध श्ाश्चद्गठ्ठ ड्डह्मद्वह्य.

हे मे वेस्टचं म्हणणं अशोकला तंतोतंत लागू पडतं.

अशोक मे वेस्टसारखाच.

एक भन्नाट, प्रामाणिक आणि मिष्किल इसम- चुकलो, लोकटा.
***
मे वेस्ट नक्की काय म्हणालेली, ते ह्या लेखात छापून आलं होतं ते काही खूप प्रयत्न करूनही सापडलं नाही. त्यामुळे वेबसाईटवर ते सापडलं तेव्हा जसं विचित्र दिसत होतं तसंच ठेवलंय.
***
('लोकटा' ह्या गौरकिशोर घोषांच्या कादंबरीचं शहाण्यांनी 'इसम' असं जे भाषांतर केलं त्याचा इथे संदर्भ आहे. काहींना माहीत नसेल म्हणून नोंदवलं.)
***
शहाण्यांना वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला २००४ साली तेव्हा 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये आलेला हा लेख. 

1 comment:

मैत्र