१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Monday, October 11, 2010

शहाणे

- सुनील कर्णिक

(‘आपलं महानगरमध्ये पुस्तकाबाहेरचा पुस्तकवाला या सदरात १२. ७. १९९७ या तारखेला प्रसिद्ध झालेला मजकूर.)

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी अशोक शहाणेंची आणि माझी ओळख नव्हती. पण तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलेली एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आहे.
त्या काळी आम्ही अधूनमधून सर्वोद्य साधना साप्ताहिकाच्या कचेरीत जायचो. तिथे काम करणारा मेघश्याम आजगावकर एकदा म्हणाला, आम्ही विनोबांच्या भूदान चळवळीच्या मदतीसाठी मुंबईत एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. तिथे एक जण आला आणि माझ्या हातात एक कापडी पिशवी देऊन जाऊ लागला. मला काहीच कळेना. मी पिशवीत डोकावून  पाहिलं तर आत नोटा आणि चिल्लर भरलेली. म्हणजे ही त्याच्याकडून भूदानाला देणगी होती. मी घाईघाईने ओरडलो- अहो, तुमचं नाव तरी सांगा! तेव्हा ते वळून म्हणाले- अशोक शहाणे. आणि निघून गेले. . .
***
यानंतर खूप दिवसांनी मी शहाणेंना प्रत्यक्ष पाहिलं. मराठी संशोधन मंडळात एक दिवशी सकाळीच डॉ. सु. रा. चुऩेकरांच्या बरोबर ते आले. त्यांनी बिनइस्त्रीचा. थोडा चुरगळलेला काळा शर्ट घातलो होता आणि खाली तशीच गडद रंगाची पॅण्ट होती. बराच वेळ दोघांचं बोलणं चाललं होतं. बोलणं खास वाटत होतं. ते निघून गेल्यावर मी चुनेकरांना विचारलं- कोण हो हे? ते म्हणाले- अशोक शहाणे. नंतर त्यांनी शहाणेंबद्दल बरीच माहिती सांगितली.
पण मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकण्याची ताकद या माणसात असेल हे मला खरंच वाटेना.
***
त्या काळी संतप्त साहित्यिकांची लघु-अनियतकालिकं जोरात होती. अशोक शहाणे हे या संतप्त साहित्यिकांचे मठाधिपती मानलो जात. या सगळ्यांची प्रस्थापित साहित्यिकांशी कायम खडाजंगी चालू असे. एकदा कोणीतरी पुढाकार घेऊन या लघु-अनियतकालिकांबद्दल संग्रहालयात चर्चा ठेवली. राम पटवर्धन, प्र. श्री. नेरूरकर, अशोक शहाणे, असे अनेक वक्ते होते. बाकी सगळे जण वेळेवर हजर राहिले आणि काय बोलायचं ते बोलले. अशोक शहाणे मात्र आलेच नाहीत. नंतर प्र. श्री. नेरूरकरांनी रविवारच्या मराठ्यात सगळ्यांचा समाचार घेणारा लेख लिहिला. त्यात त्यांनी अशोक खरे शहाणे असा मथळा देऊन त्यांच्या गैरहजेरीची हजेरी घेतली होती.
*** 
याच काळात मी दुर्गाबाईंना भेटायला एशियाटिक सोसायटीत जाऊ लागलो, तेव्हा शहाण्यांशी वारंवार भेटी होऊ लागल्या. मी अर्थात फक्त ऐकण्याचंच काम करत असे. येणार्‍या-जाणार्‍याशी मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगालीत ते बोलत. त्यातला काही भाग मला कळत नसे. पण शहाण्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव आणि त्यांचे उच्चार इतके खास असायचे की बघत आणि ऐकत राहावंसं वाटायचं.
वरवर पाहता शहाणे अबोल वाटतात. पण एकदा बोलायला लागले की तासन् तास बोलतात. पाणिनीचं व्याकरण किती ग्रेट आहे यावर ते एकदा एशियाटिक सोसायटीच्या कॅण्टीनमध्ये तास-दीड तास माझ्याशी बोलले होते. अहो, मग तुम्ही याच्यावर पुस्तक का लिहीत नाही? असं मी विचारल्यावर ते सोड. एवढंच म्हणून त्यांनी तो विषय बंद केला.
***
एकदा मी पुण्याला जात होतो तेव्हा ते आणि त्यांचे परममित्र कृष्णा करवार मला गाडीत भेटले. मग पुढचे चार तास ते दोघं अनेक विषयांवर बोलले. त्यापैकी पुण्याच्या पटवर्धन बंधूंचं सुप्रसिद्ध संगम मुद्रणालय ओरिएण्ट लाँगमनन कंपनीच्या घशात कसं गेलं याची शहाण्यांनी सांगितलेली तपशीलवार हकिगत माझ्या कायमची लक्षात राहिली.
आणखी एकदा माझा मुक्काम पुण्यात होता, तेव्हा रात्रीच्या वेळी ते रस्त्यात दिसले. कुठून आलात? असं विचारलं तर सातार्‍याहून म्हणाले. माझ्या लॉजवर येता का? म्हणालो, तर उत्तर आलं- छे छे! इथे स्वतःचं घर असताना लॉजवर कोण राहील?मग तिथेच फूटपाथवर उभं राहून रात्री साडेदहा-अकरापर्यंत आम्ही गप्पा मारल्या. ते अधूनमधून बाजूच्या पानवाल्याकडून पान घेत होते. त्यामुळे की काय, गप्पा रंगतच गेल्या. . .
*** 
पुढे सांगोपांग वासूनाका नावाचं भलं-भक्कम पुस्तक प्रसिद्ध झालं. भाऊ पाध्येंच्या वासूनाकावर जे काही बरं-वाईट छापून आलं होतं ते सगळं या पुस्तकात एकत्र केलेलं होतं. मी त्यावेळी नवशक्तित होतो आणि या पुस्तकावर अशोक शहाणेंकडून लिहून घ्यावं असं मला वाटत होतं. कारण वासूनाका लिहिताना शहाणेंनी महत्त्वाच्या सूचना केल्या असं भाऊंनी म्हटलेलं होतं.
मी शहाणेंना जाऊन भेटलो. त्यांनी सांगोपांगवर लिहिण्याचं कबूल केलं. पुस्तक ताब्यात घेतलं. अमुक तारखेला मजकूर देतो म्हणाले.
ती तारीख उलटून बरेच दिवस झाले, तरी शहाणेंकडून मजकूर येईना. ते काही ना काही सबबी सांगत राहिले. लिहिलंय पण अजून पक्कं करतोय, आज लिहिलेलं घरी राहिलं, सध्या ते एकाला वाचायला दिलंय, वगैरे. मग एकदा म्हणाले, आता भाऊ पाध्येला वाचायला दिलंय. त्याने बघून दिलं की तुला देतो.
त्यांच्याकडून बाहेर पडलो तर समोर भाऊ पाध्येच भेटले. त्यांना विचारलं तर ते म्हणाले- अशोक थापा मारतोय. चल आपण त्याच्याकडे जाऊ.
तिकडे गेलो तर शहाणे नाहीसे झालेले.
अखेरपर्यंत त्यांच्याकडून ते परीक्षण मिळालं नाहीच.
त्यांनी का लिहिलं नाही, त्यांचं त्यांनाच ठाऊक.
***
मधे दिनांक नावाचं साप्ताहिक चालू होतं. त्याचे पहिले संपादक होते अशोक शहाणे. या साप्ताहिकात दिलीप चित्रेंचं चाव्या नावाचं सदर चालू झालं. त्याची शैली शहाणेंच्या शैलीशी इतकी मिळतीजुळती होती की चित्रेंच्या नावाने स्वतः शहाणेच ते सदर लिहिताहेत असा मला दाट संशय होता- आणि तसं मी शहाणेंना हटकलंही.
पुढे काही दिवसांनी त्या साप्ताहिकाच्या कचेरीत गेलो, तेव्हा शहाणेंनी मुद्दाम त्या सदराचं हस्तलिखित काढून मला दाखवलं आणि विचारलं- बघ, दिलीपचंच अक्षर आहे ना?
मला कबूल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
*** 
अशोक शहाणे पोटापाण्याचा उद्योग काय करतात?
अनेकांना हा प्रश्न पडतो.
शहाणे पैशांच्या विवंचनेत कधी दिसत नाहीत.
फक्त एकदा ते मला म्हणाले होते- मलाही पुस्तकाची कामं मिळाली तर बघ ना.
मी सहज त्यांना त्यांची अपेक्षा विचारली. तर ती आम्हाला मिळणार्‍या मोबदल्याच्या मानाने इतकी जास्त होती की बोलणंच खुंटलं.
***
काही वर्षांपूर्वी अनिल बांदेकर नावाचा नागपूरकडचा कवी तरूण वयात कॅन्सरने निधन पावला. त्याच्या मित्रांनी त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचं ठरवलं. रमेश पानसे, वासंती मुझुमदार, अशोक शहाणे वगैरेंचा त्यात पुढाकार होता. मौज प्रेसमध्ये संग्रह तयार झाला. प्रकाशन समारंभ ठरला. वासंती मुझुमदारांनी मंगेश पाडगावकरांना अध्यक्ष म्हणून बोलावलं. पोदार कॉलेजमध्ये समारंभ सुरू झाला- आणि पाडगावकर भाषणाला उभे राहताच शहाणे आणि त्यांचे आठ-दहा मित्र अचानक उठून सभा सोडून गेले! पाडगावकर ज्या प्रकारच्या कविता लिहीत होते त्याबद्दलची यांची ही नापसंती होती. पाडगावकरांनी अर्थातच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते संतप्त नव्हते आणि हे संतप्त होते, हा त्या दोघांमधला फरक होता.
***
शहाणेंच्या तोंडून निरनिराळे किस्से ऐकणं हा एक धमाल अनुभव असतो. गोविंद तळवलकरांबरोबरचा त्यांनी सांगितलेला एक किस्सा असा आहे-
भालचंद्र नेमाडे काही वर्षं इंग्लंडमध्ये होते. ब्रिटिश लोकांचे फार विचित्र अनुभव त्यांना आले. त्याबद्दल कुठे तरी लिहावं अशी नेमाडेंची इच्छा होती. म्हणून शहाणे त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवलकरांकडे घेऊन गेले. पण तळवलकर पडले पक्के ब्रिटिशधार्जिणे. ते म्हणाले, मी इथे संपादक असेपर्यंत तरी ब्रिटिशांच्या विरोधी मजकूर प्रसिद्ध होऊ शकणार नाही.
यावर शहाणेंनी त्यांना हसत हसत काय सुनावलं असेल? ते म्हणाले, तळवलकर, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, ब्रिटिश १९४७ सालीच हा देश सोडून गेले!’
*** 
मध्यंतरी मॅजेस्टिक बुक स्टॉलचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्या निमित्ताने मी प्रकाशन व्यवसायातील निरनिराळ्या लोकांच्या प्रतिक्रिया गोळा करत होतो. शहाणेंनी मला मॅजेस्टिकच्या संबंधातले सहा किस्से सांगितले, आणि वर म्हणाले, तुझी हिंमत असली तर हे सगळं पेपरात छाप.त्यातले तीन किस्से मी त्यांच्या नावाने छापले. उरलेले तीन छापण्याची माझी हिंमत झाली नाही, हे कबूल करायला पाहिजे. आता ते न छापलेले किस्से कोणते होते, हे मला विचारू नका. हिंमत असली तर शहाणेंनाच विचारा!   चार वर्षांपूर्वी आज दिनांक नावाचं सायंदैनिक सुरू झालं होतं. त्याचे पहिले सल्लागार संपादक होते अशोक शहाणे. त्यांच्या पत्रकारितेच्या कल्पना आणि तिथल्या इतरांच्या कल्पना यात इतकी तफावत होती की बर्‍याच वेळा धमाल उडे.
आज दिनांकची कचेरी होती दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये. एक दिवस शहाणे त्या मार्केटमधून कचेरीत येत होते, तेव्हा त्यांना ढीगभर झुरळं मारून टाकलेली दिसली. ते घाईघाईने वर आले आणि तिथे हजर असलेल्या वार्ताहरांना म्हणाले,
खाली मार्केटमध्ये जाऊन या. तुम्हाला काय दिसतंय ते सांगा.
त्या तरुणांचा घोळका मार्केटमध्ये फिरून आला.
काय बघितलंत?’- शहाणे
त्या बिचार्‍यांना बघण्याजोगं खास काहीच दिसलं नव्हतं.
असं कसं? मेलेल्या झुरळांचा ढीग बघितला नाहीत?
हो, पण त्यात काय विशेष. . .
अरे वेड्यांनो, तीच तर मोठी बातमी आहे!
आता यात बातमी काय, ते त्या पोरांना कळेना आणि यांना कसं सांगावं ते शहाणेंना कळेना! ती बिचारी ढीगभर झुरळं जिवानिशी वाया गेली.
***
गेल्या वर्षी आम्ही समकालीन संस्कृती नावाचं मासिक सुरू केलं. त्याच्या दिवाळी अंकात मी मौजेचे दिवस नावाचा मोठा लेख लिहिला. त्याची थोडीफार चर्चा झाली. मी लगेच हवेत तरंगू लागलो. मौज प्रकाशनाबरोबर शहाणेंचे संबंध बरीच वर्षं बिघडलेले आहेत- त्यामुळे त्यांना हा लेख वाचायला आनंद वाटेल, अशा समजुतीने मी तो अंक मुद्दाम त्यांना नेऊन दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्सुकतेने त्यांना फोन केला-
काय, बघितलात का अंक?
ते म्हणाले, हां- तुमच्या अंकातली ती प्रदीपने घेतलेली दिलीपची मुलाखत चांगली आहे.
पण माझा लेख बघितलात का?
नाही. . . तो नाही अजून बघितला. मग दोन दिवसांनी मी पुन्हा विचारलं- माझा लेख बघितलात का?
त्यांचं उत्तर तेच- नाही अजून.
तो अभिप्राय अत्यंत बोलका आणि अविस्मरणीय होता! हवेत तरंगणार्‍या मला त्यांनी अतिशय अलगद जमिनीवर आणलं होतं.

No comments:

Post a Comment

मैत्र