- कमल देसाई
अशोक शहाणे केव्हा आणि कधी आला माझ्या आयुष्यात, हे आता आठवतसुद्धा नाही; इतका तो सहजपणे माझ्या आयुष्यात मिसळून गेलाय. रेखानं सांगितलं होतं, ‘पत्र टाका हं, आम्ही वाट पहातो आहोत.’ अजून टाकतेच आहे मी पत्र. आत तस्लिमा घट्ट डोक्यात बसली आहे. आणि मराठी लेखकांचे वाभाडे काढत काढत आणखी काय काय लिहिणार आहे तो याचे मलाही कुतूहल आहे.
पण तो इथे तिथे, अवती भवती असणं आणि त्याचं बोलणं चालू असणं ही एक मजाच असते त्याच्या एकेक अफलातून आणि भन्नाट कल्पना म्हणजे विचारांचे नवे नवे धुमारे असतात. कशातही त्याला तिरपागडं दिसतंच आणि तो मग आपल्या खास अशोकी शैलीत खाड्दिशी मांडणार आपल्याला त्याचे विचार पटले नाहीत असं म्हटलं तर तो रागावतो किंवा समर्थन करतो, असं नाही परंतु मला नेहमीच त्याच्या या कशातही ‘तिरपागडं दिसण्याचं’ आणि ते थेट अगदी थेट मांडण्याचं आकर्षण वाटत आलं आहे. छान, थेट मराठी कसं लिहावं हे तो खूप वेळा सहजपणे सांगून जातो. त्याचं असांकेतिक जगणं-असणं, जिथल्या तिथं अत्यंत कर्मठपणानं काही मूल्य सांभाळणं, आणि सदैव ताजेपणानं प्रत्यक्षाला भिडणं हे सर्वच जरा कठीण. मला खूप जण विचारायचे, ‘तुम्हाला अशोकची आणि त्याच्या सभोवतालच्या मित्रमंडळींची भाषा समजते कशी?’ खरंच समजते का? तो त्याचा रोज एक नवा मित्र आणायचा. अतिगंभीरपणे त्याला ऊर्दू शिक म्हणायचा. कुणाला तरी गज्जलांच्या क्लासला जायला लावायचा आणि कोण चांगलं शिकवतं हे पण सांगून द्यायचा. ती बिचारी मुलं खरंच फार भक्तीनं ते करत. स्वतःही ऊर्दू बोलत, बंगाली बोलत, गजला म्हणत. सर्वांना गार गार करायचा. त्याच्या मंडळींची एक खास ढब असायची बोलण्याची. पुण्यात काय आणि मुंबईत काय, त्याने इतक्या हॉटेलांतून इतके नवे नवे काही खायला घातले की, मी ते सर्व विसरलेसुद्धा. पण कॉफी हौसची ‘कोल्ड कॉफी वुइथ थिक क्रीम’ मात्र कधी विसरले नाही.
या सगळ्यांबरोबरचा अशोक आणि मला भेटलेला अशोक एकच नसावा. तशी नसत असावी माणसं. ती वेगळी वेगळी होतात, असतात. त्याने मला झाडून सारी शंभू मित्राची बंगाली नाटकं दाखवली आणि सिनेमे तर इतके! ‘चारूलता’ त्याला फार आवडतो. मला नाही. गुरुदत्त डायरेक्टर म्हणून चांगला असेल, पण त्याला अभिनय नसावा असं मला वाटायचं. मला खूप मीनकुमारी किंवा वहिदा नाही आवडायची जशी की शबाना आवडते, नसिरुद्दीन आवडतो. ओम पुरी तर खूपच. पण एवढं असूनही तो असला की इतकी गंमत येते कशी? श्याम मनोहर नेहमी म्हणतो, ‘एवढी काही मजा नाही, नाही?’ असं त्यानं म्हटलं की मला अशोक हमखास दिसतो. आणि तो म्हणजेच एक मजा असते असं वाटून जातं.
मी तेव्हा पुण्यात होते. कर्वे रोडवर जरा आत, एक गच्ची असलेलं छानसं घर मला मिळालं होतं. पण तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते. घुसमटही चाले माझी. अशोकला न सांगताच कळायचं, काहीही चौकशी न करता, प्रश्न न विचारता तो रोज रोज संध्याकाळी यायचा. मी म्हटलं, ‘किती छान आहे ना गच्ची नि असं एकटंच संध्याकाळचं खूप बरं वाटतं नाही?’
‘म. . मग एवढी पा-पायपीट करून मी तु. . . तुझ्याकडे आ.. आलो ते क-कशा करता?’ आणि हसला. मला एकदम गुहेतून- खोल खोल गुहेतून वर वर येऊन मोकळं वाटू लागलं. आपण सुट्या होऊन आकाशभर पसरतो आहोत, असं झालं आणि मी मलाच सापडले. आम्ही दोघे मग गच्चीत तसेच पडलो. आणि मला तो आकाश वाचायला शिकवू लागला. ‘एकदम सगळं आकाश नाही बघायचं. थोडा थोडा नेमून घ्यायचा भाग आणि तेवढाच रोज रोज वाचायचा. मग कळतं. सर्व आकाशसुद्धा.’
‘कळतं काय डोंबल? तू एक सांगणार! मला तर सगळंच आकाश दिसतंय आणि आकाशात हरवायला पण होतंय. मी आताच हरवून गेले आकाशात. मी काही अर्जुन नाही बाबा.’
भिवंडीला असताना तर नवीन काही सुचलं की एक बार ठासून, तोंडात गुळणी धरून यायचाच गडी. त्याला हे सगळं सुचायचं कसं कोण जाणे! तेव्हा टेपची सोयच नव्हती. एकदा म्हणाला, मीरा एक ग्रेटच हं. द्वापारातून उचलून एकदम खाड्दिशी कृष्णाला म्हणजे तिनं प्रत्यक्षच, आज. इथं प्रत्यक्ष केलं म्हणजे काय झालं काय! त्याची भाषा नाहीच जमत. थोड्या वेळानं दुसरं. आज गाडीत एक आंधळा म्हातारा आणि त्याची आंधळी म्हातारी होती. ती दोघं स्टेशनात शिरल्यावर आधी त्यांनी गाडीला नमस्कार केला. ‘होय, होय, मायबाप हाय ती अपली.’ असं म्हणत गळ्यातला पंढरीचा फोटो सावरत डब्यालाही नमस्कार करून आत शिरली. आपलं सारं हे सगळं अफलातून हं. एकदम अफलातून. असा तो आला की कधी कधी घरात काहीसुद्धा नसायचे आणि स्वयंपाक करण्याचा मनस्वी कंटाळा. भाकरीचं पीठही शिळं फार. मी पार गोंधळले. ‘कमळे तू ऊठ. तुझं काम नव्हे ते.’ आम्ही जेवायला बसलो, तर ‘अशोक, भाकरी कडू लागते कारे, कडू झालंय रे पीठ.’ मी ओशाळलेली आधीच त्यानं स्वयंपाक केला म्हणून आणि त्यातूनच. . . तर तो म्हणतो कसा, ‘पोटात गोड होतं ते सर्व. आपण दोघंही चांगले निरोगी, तगडे आहोत. चल खा तू.’ मी बघतच राहिले. याच्याजवळ ही सहजता आली कोठून?
१२५ वर्षांचं जुनं पंचांग शोधून त्यानं एकदाची माझी पत्रिका तयार केली. आणि काही तरी जिंकून आल्यागत आला. आल्यापासून, ‘जर् रा चुकलं बघं. पाच मिंटं अधी जन्माला आली असतीस ना, तर राजाची राणी झाली असतीस. अगदी पाचच मिंटं आधी.’ मी चांगलीच वैतागले. पण सारा दिवस कानाशी भुणभूण. पत्रिका एकूण खूपच वाईट कशी आहे आणि किती आहे. मला वाटलं जगात मी एकटी एकच इतकं सर्व वाईट घेऊन जन्माला आले की काय? मी ऐकता ऐकता झोपले. तर उठवून सांगणार- ‘ऐक तरी-‘ ‘मरू दे ना ती पत्रिका.’ ‘पण ऐक ना’ पुन्हा सुरू. नि म्हणाला, ‘बाकी कमळे, काही न ऐकता ऐकण्याचं सारं कौशल्य चेह-यावर ठेवता येतंय तुला, म्हणजे तू एकदम ग्रेटच असली पाहिजेस.’
त्यानं केलेल्या चळवळीत मला भाग घ्यायला पत्र लिहायचा. पण लिहिणं मला फारसं आवडतच नसे. एकटं, स्वतंत्र आत्मसन्मानानं, आत्मप्रतिष्ठेनं आणि आनंदात जगणं हे जसं मला कठोरपणे करावंसं वाटलं. तसं मला लिहावसं वाटलंच नाही. लिहिणं झालं, ती देवाची कृपा, आपापतः ठरवून नाही. मी डांगेच्या कथांवर एक लेख लिहिला होता सत्यकथेत. तर म्हणाला, ‘तुझा हा लेख. इतक्या काही वाईट नाहीत ह्या कथा. जरा बरा लिहितो तो. फार नाही. पण जरा.’ तसंच आता हे वाचून मला म्हणेल आपल्या जिवण्यांच्या कोप-यांना मुरड मुरड घालत, ‘इतका काही मी वाईट नसावा. जरा बरा असेन.’
मला धो धो हसू येईल.
***
***
'महाराष्ट्र टाइम्स'च्या १९९४च्या 'वार्षिक'मध्ये 'निर्भयस्पर्शी दुर्गाबाई नि अफलातून अशोक' हा लेख प्रसिद्ध झालेला. त्यातला दुसरा भाग हा.
No comments:
Post a Comment